नूरजहान, खुर्शीद आणि सुरैय्या या तिघींपैकी आपण सुरैय्यावर जास्त प्रेम केलं. ती दिलकी धडकन बनून आपल्या देशात राहिली, तिनं देवानंदवर मनापासून प्रेम केलं. ग्रेगरी पेक या हॉलिवूड अभिनेत्याला तिच्याबरोबर डेटिंग करावंसं वाटलं. ती दोघं भेटली देखील.
.आणि सुरैय्यावर विशेष प्रेम कारण तिने ‘मनमोराला’ प्रेरणा दिली. मित्रा, मनमोराचा पिसारा फुलणं या गोष्टींची सांगीतिक ओळख सुरैय्यानं करून दिली.
मला विचारशील तर तिचं नैन दिवाने (इक नहीं माने ना. हे गाणं अधिक आवडतं.) प्रेमात हरवलेले दिवाने नैन आपले जणू वैरी बनतात. नैनोमे बसी प्यारकी मूरत हटवतच नाहीत. अशा डोळ्यांची कहाणी सुरैय्या सांगते तेव्हा कळतं की इतके दिवस आपले वाटणारे डोळे केव्हाच परके झाले होते. आपल्याच डोळ्यांची तक्रार सुरैय्या अतिशय प्रभावीपणे करते. प्रेमामध्ये प्रियकराबद्दल ओढ असते, पण त्या ओढाळ मनाविषयी, आपल्याच डोळ्याबद्दल प्रेमिकेच्या मनात अॅग्विंश निर्माण होते. प्रेमामधली ही कशिश, आत्मच्छल सुरैय्या ताकदीने पेश करते.
मुळात, ती गाणंबिणं शिकलेली नव्हती. पण उपजत सौंदर्य होतं. टपोऱ्या डोळ्यात गूढ भावना होत्या. म्हटलं तर दु:खी, उत्कट आणि म्हटलं तर तीक्ष्ण भावना सुरैय्या व्यक्त करायची. मधुबालेच्या डोळ्यात मिश्कीलपणा तर सुरैय्याच्या डोळ्यात सम्मोहितपणा करण्याची ताकद होती. एक एक अभिनेत्री म्हणजे टपोरे, पाणीदार खानदानी मोती होते.
सुरैय्याचं मनमोर हुआ मतवाला गाणं प्रेमातली अनुरक्त होणं बहारपणे मांडतं.
देवानंदबरोबरच्या अफसर (१९५०)च्या सिनेमाला सचिनदानी संगीतबद्ध केलं. पं. नरेंद्र शर्मानं हे गाणं लिहिलं आणि सचिनदानी स्वत: गायलं. मित्रा, मनमोर हुआ मतवाला हे गाणं सचिनदानी त्यांच्या धीरगंभीर, आत्ममग्न बंगाली ढंगानी कसं गायलं असेल, ही कल्पना केलीस तरी अंगावर रोमांच येतात. सुरैय्यानं ‘दादा, आपनी-कोथा’ म्हणून हट्ट धरला, पण सुरैय्याकडून त्यांनी गाऊन घेतलं. हे कळण्यावर वाटतं की गाण्यातला लडिवाळपणा, सुरैय्यानं गालगोबरे करून सादर केला, त्याला तोड नाही. बाकी गाण्यातले शब्द आणि मेटॅकर तसे परिचित, फक्त सुरैय्या म रोमरोम मधुशाला म्हणते तेव्हा तिच्या अंगप्रत्यंगातून झिरपणारं सौंदर्य वेडावून टाकतं.
असं वाटतं की मनमोराच्या पिसाऱ्यानं मलाच मतवाला बनवलंय, मित्रा पिसाऱ्यावर तू भरभरून प्रेम केलंस म्हणून पुन्हा एकदा मनमोर हुआ मतवाला, किसने जादू डाला. तूच जादू केलीस रे मित्रा, तुझ्या प्रतिसादानं पिसारा फुलला.
डॉ. राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com
कुतूहल : पाया आणि तळघर
बांधकाम, मग ते कुठल्याही इमारतीचे असो, अतिशय काळजीपूर्वक करायला हवे. अगदी पायापासून ते गच्चीपर्यंत सर्वच घटक महत्त्वाचे आहेत. कुठेही चूक राहता कामा नये. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्याकडे त्यासाठी बारकाईने बघायला हवे. पाया जितका मजबूत तितकी इमारत सुस्थिर राहील. मजबूत पाया
कीर्ती वडाळकर
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२
office@mavipamumbai.org
सफर काल-पर्वाची : होआ-हाओ
दक्षिण व्हिएतनाममध्ये फ्रेंचांचा पाठिंबा असलेले सरकार कार्यरत असताना खेडय़ापाडय़ातले लोक निरनिराळे महंत, मठ व त्यांचे पंथ यांच्या नादी लागले होते. त्यापैकीच होआ-हाओ हा एक पंथ होता. या पंथाचा गुरू फू सो हा कंबोडियाच्या व दक्षिण व्हिएतनामच्या सरहद्दीतील गावातून आलेला होता. १९३९ साली फू सो याने डॉक्टरांनी आशा सोडलेला, मृत्युपंथाला लागलेला एक मंत्रसामर्थ्यांने पूर्ण बरा केल्यामुळे त्याची सगळीकडे चर्चा होऊ लागली. होआ-हाओ या त्याच्या गावाच्या नावावरून त्याच्या पंथाचेही नाव होआ-हाओ पडले. फू सोकडून उपचार करून घ्यायला लोकांची रीघ लागली.
फू सो हा आपली शिकवण सांगणारी पुस्तके लिहून भक्तांना वाटीत असे. त्यात आत्मसुधारणा, अज्ञान, अहंकार नष्ट कसे करावे यावर भर असे. थोडाफार फरक केलेला तो बौद्ध धर्मच होता. होआ-हाओ पंथाचे विशेष म्हणजे तो लोकांमध्ये राज्यकर्ता फ्रेंचांबद्दल तिरस्कार निर्माण करीत असे. १९४० साली फ्रेंचांनी फू सो याला पकडले व वेडा ठरवून वेडय़ांच्या रुग्णालयात ठेवले. फू सोवर मानसोपचार करण्यासाठी व्हिएतनामी मानसोपचार तज्ज्ञ येत. गंमत म्हणजे डॉक्टरांनी फू सोवर उपचार करण्याऐवजी फू सोनेच त्यांना आपली शिकवण दिली. इस्पितळातले सर्व डॉक्टर व इतर कर्मचारीवर्ग पूर्ण त्याचा भक्त झाला. फू सो त्यांचा गुरू झाला.
फ्रेंच लोकांना हे समजल्यावर ते फू सो याला रुग्णालयातून बाहेर काढावयाच्या मागे लागले. परंतु फू सोवर उपचार करणारे वैद्य तो अजून बरा झालेला नाही, अशी सबब सांगून त्याला सोडीत नव्हते. शेवटी आपलेच काहीतरी चुकले असावे, क्षुल्लक कारणावरून जनतेचा क्षोभ नको म्हणून फ्रेंचांनी त्याला सन्मानाने सोडून दिले!
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
इतिहासात आज दिनांक.. २१ डिसेंबर
१९७९इतिहास संशोधक आणि चरित्रकार नरहर रघुनाथ फाटक यांचे निधन. १५ एप्रिल १८८३ रोजी भोर संस्थानमधील जांभळी गावी त्यांचा जन्म झाला. तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय होते. नोकरीचा श्रीगणेशा मराठीचे प्राध्यापक म्हणून एसएनडीटी विद्यापीठातून केला. मुंबईतील वास्तव्यात त्यांचा पत्रकारितेशी संबंध आला. इतिहासाचार्य राजवाडे यांच्या प्रभावाने ते इतिहास संशोधनाकडे वळले. इंग्रजी, संस्कृत, हिंदी, गुजराती, उर्दू, मराठी यावर त्यांचे प्रभुत्व होते. शास्त्रीय संगीत, चित्रकला यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांनी नवाकाळ, इंदुप्रकाश, सुबोधपत्रिका, विविधवृत्त, आलमगीर या वृत्तपत्रांतून लिहिले. सत्यान्वेषी परिश्ता या टोपणनावाने त्यांनी लिहिले. श्री ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी, श्री. एकनाथ -वाङ्मय आणि कार्य, श्री रामदास वाङ्मय आणि कार्य, श्री ज्ञानेश्वर- वाङ्मय आणि कार्य, मराठेशाहीचा इतिहास, नारायणरावाचा खून की आत्महत्या? हे ग्रंथ आणि यशवंतराव होळकरांचे चरित्र, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, आदर्श भारत सेवक गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य, नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ही चरित्रे त्यांनी लिहिली. गोखलेंच्या चरित्राबद्दल त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. मुंबई शहराचा इतिहास, अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष, रशियाचे संक्षिप्त दर्शन हे प्रवासवर्णन त्यांनी लिहिले. १९२९ मध्ये खाडिलकरांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती ती फाटकांनी लिहिलेल्या अग्रलेखामुळेच.
१९८४ रशियाचे संरक्षणमंत्री मार्शल उस्तिनोव यांचे निधन.
डॉ. गणेश राऊत
ganeshraut@solaris.in
