भाषासूत्र : कूस- कुशी, मूस- मुशी

‘बाळाला डाव्या कुशीत घेऊन आई पलंगावर पडली होती. थोडय़ा वेळाने बाळ झोपले आहे, हे लक्षात आल्यावर तिने कुशी बदलली.’

भाषासूत्र : कूस- कुशी, मूस- मुशी

-यास्मिन शेख

‘बाळाला डाव्या कुशीत घेऊन आई पलंगावर पडली होती. थोडय़ा वेळाने बाळ झोपले आहे, हे लक्षात आल्यावर तिने कुशी बदलली.’ या वाक्यात एक चूक आहे. ती ‘कुशी’ या शब्दासंदर्भात आहे. ‘तिने कुशी बदलली’मध्ये ‘कुशी’ हा शब्द नाम, स्त्रीलिंगी एकवचनी योजलेला आहे. मग दोन्ही कुशींचा उल्लेख करताना या शब्दाचे अनेकवचन काय होणार? कुशी एकवचन, तर अनेकवचन कुश्या? असे रूप कोठेच आढळत नाही. खरे पाहता, ‘कुशी बदलली’ या वाक्यरचनेचा व्याकरणिक अर्थ असा होतो की ‘कुशी’ हे एकवचनी नाम आहे! मूळ शब्द आहे- कूस (कुशी नव्हे). या नामाचे अनेकवचन कुशी असे आहे. (कूस-नाम, स्त्रिलिंगी, एकवचनी, कुशी-नाम, स्त्रिलिंगी, अनेकवचनी) कूस या एकवचनी शब्दाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागल्यास त्या शब्दाचे सामान्यरूप कुशीत, कुशीवर, इ. तर अनेकवचनी सामान्यरूप कुशींना, कुशींवर असे होईल. याचा अर्थ असा की, ‘कुशी’ हा एकवचनी, प्रत्यय वा शब्दयोगी अव्यय न लागलेला शब्द नाही. त्यामुळे वरील वाक्य ‘बाळाला डाव्या कुशीत घेऊन आई पलंगावर पडली होती, थोडय़ा वेळाने बाळ झोपले आहे, हे लक्षात आल्यावर तिने कूस बदलली.’ असे असायला हवे.

संस्कृत शब्द कुक्षी (नाम, स्त्रीलिंगी एकवचनी) आहे. त्याचे मराठीत आलेले तत्भव रूप ‘कूस’ आहे. कुक्षी या शब्दाचा अर्थ आहे शरीराची एक बाजू, कड. मराठीतही कूस शब्दाचा तोच अर्थ आहे. आणखी असेच काही स्त्रीिलगी शब्द पाहा :   घूस- अर्थ- उंदरासारखा एक प्राणी. घूस- स्त्रीलिंगी, एकवचनी नाम. घुशी- अनेकवचनी व सामान्यरूपही.

मूस- अर्थ- धातूचा रस काढण्याचे पात्र, साचा. मूस- स्त्रीलिंगी- एकवचनी. मुशी- अनेकवचनी

काही शाब्दिक चुका

कोटी- कोटय़धीश- बरोबर (कोटय़ाधीश- चूक), कोटय़वधी-बरोबर (कोटय़ावधी- चूक)

कुटुंब- कुटुंबीय- बरोबर (कुटुंबिय- चूक), कुटुंबीयांना- बरोबर (कुटुंबियांना-चूक)

अलंकार- आलंकारिक- बरोबर (अलंकारिक- चूक)

अध्यात्म- आध्यात्मिक- बरोबर (अध्यात्मिक- चूक) परंपरा- पारंपरिक- बरोबर (पारंपारिक- चूक)

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi correct word marathi language learning zws

Next Story
भाषासूत्र : ‘पुराणातली वांगी’ आणि ‘लष्करच्या भाकऱ्या’
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी