हे वाक्य वाचा- ‘मला हवी होती ती पालेभाजी त्या मंडईत मला भेटली.’ आणखी एक मला आलेला अनुभव सांगते. माझ्या परिचयाचा एक मुलगा मला म्हणाला, ‘अहो, ऐका ना! माझ्या बोटातली अंगठी कुठे पडली, हे मला कळेना. घरभर शोधली. अचानक खुर्चीच्या पलीकडे पडलेली दिसली. माझी हरवलेली अंगठी मला भेटली, याचा मला खूप आनंद झाला.’ पहिल्या वाक्यात आणि दुसऱ्या वाक्यांतील शेवटच्या वाक्यात ‘भेटली’ हे क्रियापद वापरले आहे. भेट-भेटणे याचा अर्थ-गाठ पडणे, आलिंगणे, कवटाळणे हा आहे. व्यक्तीची, माणसाची रस्त्यात भेट होते. पालेभाजी, अंगठी इ. ची भेट होत नाही. ही वाक्ये अशी हवीत- ‘..त्या मंडईत मला ती पालेभाजी मिळाली.’ आणि दुसरे वाक्य- ‘..माझी हरवलेली अंगठी मला मिळाली,(किंवा सापडली)’. मिळणे याचा अर्थ हातात येणे, सापडणे, आढळणे, प्राप्त होणे असा आहे. मराठीच्या कोल्हापुरी बोलीत ‘मिळणे’ या अर्थी ‘भेटणे’, हा शब्द वापरतात. मराठीच्या लेखनात, विशेषत: औपचारिक लिखाणात आणि आपण बोलतो त्या प्रमाण भाषेत ‘मिळणे’ ऐवजी ‘भेटणे’ हा शब्द योजणे योग्य नाही.
औपचारिक लेखनात ‘भाजी भेटली’, ‘अंगठी भेटली’ अशी सदोष वाक्यरचना करू नये. ऐकणाऱ्याला अशा वाक्यांचा अर्थ अंदाजाने कळेलही, पण ‘भेटणे’ शब्दाचा खरा अर्थ लक्षात घेऊन अशा प्रकारची वाक्यरचना मराठी भाषकांनी टाळावी हे उत्तम. भाषेचे, तिच्यातील शब्दांचे योग्य रूप जपणे आपले कर्तव्य आहे.
आता काही शाब्दिक चुका :
आधी बरोबर शब्द – नंतर चूक शब्द/लेखन :
साहाय्य – सहाय्य, साहाय्यक – सहाय्यक निर्भर्त्सना – निर्भत्सना, औदासीन्य – औदासिन्य, कळसूत्री – कळसुत्री,
प्रथितयश – प्रतिथयश,
अनुरूप – अनुरुप,
दुर्मीळ – दुर्मिळ
नेहमी – नेहेमी,
एखादा – एकादा
अनिर्णीत – अनिर्णित,
तत्काळ – तात्काळ
हत्या – हत्त्या, गुरुवार – गुरवार
– यास्मिन शेख