फिरायला, सहलीला जायला प्रत्येकालाच आवडतं, पण दोन वर्ष जंगलात जाऊन राहायची कल्पना कशी वाटते? जी माणसं हे करू शकतात त्यांच्या मेंदूतले न्यूरॉन्स निसर्गात राहण्यासाठी जुळलेले असतात, असं म्हटलं तरी चालेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिस्कव्हरी वाहिनीवर जी माणसं साप, हत्ती, वाघ किंवा अत्यंत छोटे कीटक, माती, पानं, झाडं यांच्यावर संशोधन करत असतात. अनेकदा तर स्वत:चा जीव धोक्यात घालून हा अभ्यास करतात. चित्रण करतात. या माणसांमध्ये निसर्गविषयक बुद्धिमत्ता (naturalistic intelligence) असते, असं डॉ. हॉवर्ड गार्डनर म्हणतात.

आजच्यासारखी कोणतीही विशेष सुविधा नसताना डॉ. सलीम अली हे पक्ष्यांवरच्या प्रेमापायी जंगलात फिरायचे. तहान-भूक विसरून ते पक्ष्यांचा शोध घ्यायचे. पक्षी काय करतात, कुठे राहतात, घरटी कशी बांधतात, त्यांचे एकमेकांशी संबंध कसे असतात, या विषयांचा त्यांनी अभ्यास केला. पक्ष्यांची चित्रं काढून त्यांचा संग्रह करून ठेवला. यावरून त्यांच्यात निसर्गविषयक बुद्धिमत्ता होती हे लक्षात येतं. सलीम अली यांनी केलेलं काम आजही पक्षीसंशोधकांना उपयुक्त ठरत आहे.

ज्यांना गडकिल्लय़ांनी कायमच साद घातली आणि त्यांनी स्वत:च्या मनाचं ऐकलं ते गो.नी. दांडेकर यांनादेखील कोणतीही विशेष सुविधा मिळाली नाही. पण तरीही त्यांनी गड-किल्ले पालथे घेतले. बहिणाबाईंना निसर्गकन्या म्हटलं जातं. कारण त्यांची निसर्गाकडे पाहण्याची एक वेगळीच, निरभ्र दृष्टी. मातीत बिया पेरणं, ही कृतीला आजवर किती वेळा किती जणांनी केली असेल, बघितली असेल. या घटनेबद्दल त्या म्हणतात-

धरतीच्या कुशीमध्ये बीय बियानं निजली

वऱ्हे पसरली माती जशी शाल पांघरली.

जेव्हा या निजलेल्या बीमधून छोटीशी पानं जन्माला येतात तेव्हा त्यांना ते ‘पर्गटले दोन पान जसे हात जोडीसन’ वाटतात. ही आहे निसर्गविषयक बुद्धिमत्ता. जंगल आपल्या दृष्टिकोनातून बघणारे, वाईल्डलाइफ फोटोग्राफी करणारे अनेक लोक आहेत. यामध्ये बेदी बंधू यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. वनस्पतींना भावना असतात हे सांगणारे डॉ. जगदीशचंद्र बोस, झाडाशी बोलणारे काव्‍‌र्हर. आपापल्या पद्धतीने निसर्ग संवर्धन, प्राणी-पक्षी संवर्धन करणाऱ्यांमध्ये निसर्गविषयक बुद्धिमत्ता असते.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naturalistic intelligence