– सुनीत पोतनीस

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम आफ्रिकेतला नायजेरिया हा एक संपन्न देश. आफ्रिकेतील देशांपैकी सर्वाधिक लोकसंख्या आणि जवळपास २५० वांशिक गट असल्यामुळे युरोपात नायजेरिया ‘जायन्ट ऑफ आफ्रिका’ म्हणून ओळखला जातो. या प्रदेशातून वाहणाऱ्या नायजर या नदीच्या नावावरून या देशाचे नाव पडले- नायजेरिया! अन् हे नाव दिले आहे ते ब्रिटिश पत्रकार महिला फ्लोरा शॉ हिने. परंतु या नदीवरूनच ‘नायजर’ हे नाव मिळालेला दुसरा एक देशही नायजेरियाच्या उत्तरेला आहे!

नायजेरिया हा सार्वभौम देश १ ऑक्टोबर १९६० रोजी अस्तित्वात आला. या दिवशी या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले आणि तीन वर्षांनी, १ ऑक्टोबर १९६३ रोजी तिथे अध्यक्षीय प्रजासत्ताक सरकार स्थापन झाले. नायजेरियाच्या दक्षिणेला गिनीचे आखात, पूर्वेला कॅमेरून हा देश, पश्चिमेला बेनिन, तर उत्तरेला नायजर हा देश- अशा चतु:सीमा आहेत. अनेक वांशिक गटांचे लोक असलेल्या नायजेरियात दहाव्या शतकात अरब व्यापाऱ्यांमुळे इस्लाम धर्म रुजला आणि अनेक जण व्यापार-व्यवसाय करू लागले. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात येथे दाखल झालेले पोर्तुगीज संशोधक आणि व्यापारी हे इथे आलेले पहिले युरोपीय. या काळात नायजेरियाच्या प्रदेशात बान्झा आणि हौसा या वंशांच्या बलाढ्य राज्यकत्र्यांची अनेक राज्ये पसरलेली होती. फार मोठमोठ्या शेतजमिनी या राज्यकत्र्यांच्या मालकीच्या होत्या. शेतीची आणि इतर कामे करण्यासाठी हे राज्यकर्ते मोठ्या संख्येने गुलाम ठेवीत. एकेका राज्यकत्र्याकडे असे ६०-७० हजारांपासून एक लाखापर्यंत आफ्रिकी गुलाम त्या काळात होते.

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला नायजेरियाच्या दक्षिण किनारपट्टीवर येऊन पोर्तुगीजांनी तिथल्या लोकांबरोबर व्यापार सुरू केला. पोर्तुगीज तिथे येईपर्यंत नायजेरियन प्रदेशात गुलामांचा व्यापार फक्त अंतर्गत राजे, जमिनदार यांच्यातच चालत होता. पोर्तुगीजांनी प्रथमच येथील दोन बंदरांमधून गुलामांना जहाजातून नेऊन युरोपातील देशांमध्ये विकण्यास सुरुवात केली. या किनारपट्टीला त्यांनी ‘स्लेव्ह कोस्ट’ हे नाव देऊन दोन व्यापारी बंदरांना लागोस आणि कलबार अशी नावे दिली. लागोस हे पुढे गजबजलेले व्यापारी बंदर म्हणून नावारूपाला आले. सध्या लागोस हे नायजेरियाचे सर्वात मोठे औद्योगिक शहर आहे.

sunitpotnis94@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nigeria giant of africa abn