वारे, गुरुत्वाकर्षण, पाण्याची खोली, किनाऱ्याची चढण अशा अनेक घटकांचा अंतर्भाव महासागरातील लाटांच्या निर्मितीवर होतो. त्यामुळेच विविध प्रकारच्या लाटांची निर्मिती होते. मासेमारी, मालवाहतूक, बंदरांची बांधणी या सर्व बाबी लाटांची गती व दिशा यांच्यावर अवलंबून असतात. म्हणून सागरी व्यापाराच्या दृष्टीने लाटांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लाटांचे मुख्यत: तीन प्रकार पडतात. ते म्हणजे वातलहरी, त्सुनामी (भूकंप लहरी) आणि भरती ओहोटीच्या लाटा. वाऱ्याचे पाण्याच्या पृष्ठभागाशी घर्षण होऊन पाण्याचा वरचा स्तर ढकलला जातो. या तरंगांना वातलहरी म्हणतात. वाऱ्याचा वेग, कालावधी व पाण्याची खोली यावर वातलहरींची उंची ठरते. मंद वाऱ्यामुळे सूक्ष्मतरंग तयार होतात. पाण्याच्या पृष्ठीय ताणामुळे सूक्ष्मतरंग सहज विरतात, त्यामुळे लांबवर पोहोचत नाहीत. वेगवान वारे दीर्घकाळ वाहत राहिल्यास मोठय़ा आकाराच्या वातलहरी निर्माण होतात. वारे पडल्यानंतरही या लाटा विरत नाहीत. पाण्याचे वजन व संवेगामुळे या वातलहरी हजारो किलोमीटर लांबपर्यंत पसरतात. या लाटांमुळे निर्माण होणारे फुगवटे काही वेळा जहाजांसाठी अडचणीचे ठरू शकतात. किनाऱ्याकडे येता येता समुद्रतळ व पाण्यातील घर्षण वाढत जाते. त्यामुळे लाटा आणखी जोराने उसळतात. खूप उंच लाटा पाणी धरून ठेवू शकत नसल्याने जोराने किनाऱ्यावर कोसळतात. किनाऱ्याची खोली, लाटांचा वेग, आकार व तरंगलांबी याआधारे लाटांचे अनेक उपप्रकार आहेत.

दुसऱ्या प्रकारच्या लाटा म्हणजे त्सुनामी (भूकंपी लहरी). समुद्रतळाशी भूकंप, भूस्खलन, ज्वालामुखीचे उद्रेक अशा विविध भूगर्भीय हालचाली होत असतात. या हालचालींच्या केंद्रातून मोठय़ा प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते व पाण्याचा स्तंभ मुळापासून ढवळला जातो. यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जाभारित लाटा वेगाने केंद्राकडून बाहेरच्या दिशेने फेकल्या जातात व किनाऱ्यावर उंच उसळतात. या प्रलयकारी लाटांना ‘त्सुनामी’ असे नाव आहे.

जपानी भाषेत त्सुनामी म्हणजे ‘बंदरातील लहरी’. किनाऱ्यांवर त्सुनामी लाटांची उंची दोन मीटपर्यंत व वेग ताशी ८०० किलोमीटपर्यंत असू शकतो. २००४ मध्ये हिंदी महासागरात उसळलेल्या त्सुनामीने भारतासह श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मालदीव अशा अनेक देशांमध्ये विध्वंस घडवला. त्सुनामीचा अंदाज वर्तवणे शक्य नसल्याने सागरी अभ्यासक समुद्री घटनांवर नेहमीच लक्ष ठेवून असतात.

– अदिती जोगळेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

More Stories onनवनीतNavneet
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ocean waves different types of sea waves ocean surface waves zws
First published on: 30-01-2023 at 04:35 IST