ग्रह वा ताऱ्याचे निरपेक्ष स्थान दर्शवण्यासाठी वैषुविक पद्धतीचा किंवा आयनिक पद्धतीचा वापर केला जातो. आकाशाच्या गोलावरचे आकाशस्थ वस्तूचे स्थान दर्शवणाऱ्या या पद्धती, वैषुविकवृत्त आणि आयनिकवृत्त यांवर आधारलेल्या आहेत. पृथ्वीच्या विषुववृत्ताचे प्रतल पृथ्वीबाहेर वाढवत नेले तर, आकाशात ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर तयार होणारे काल्पनिक वर्तुळ म्हणजे वैषुविकवृत्त. तसेच, ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवरील सूर्याच्या भासमान मार्गाचे वर्तुळ म्हणजे आयनिकवृत्त. ही दोन्ही वर्तुळे एकमेकांशी साडेतेवीस अंशांचा कोन करतात. या दोन वर्तुळांच्या छेदनबिंदूंपैकी एका बिंदूला वसंतसंपात बिंदू म्हटले जाते. हा बिंदू मीन तारकासमूहात वसलेला आहे.

वैषुविक पद्धतीत आकाशस्थ वस्तू विषुवांश आणि क्रांती या संदर्भाकांनी दर्शवली जाते. या पद्धतीत, वैषुविकवृत्त हे संदर्भवर्तुळ आणि वसंतसंपात बिंदू हा संदर्भबिंदू मानला जातो. विषुवांशांवरून एखादा तारा वसंतसंपात बिंदूपासून किती पूर्वेला आहे ते कळते, तर क्रांतीवरून तो तारा वैषुविकवृत्ताच्या किती उत्तरेला वा दक्षिणेला आहे ते कळते. वसंतसंपात बिंदूचे दोन्ही संदर्भाक शून्य मानले जातात. या पद्धतीत विषुवांश हे तास-मिनिट-सेकंद या वेळेच्या एककात दिले जातात. कारण विषुवांशांचा संबंध नाक्षत्रवेळेशी जोडण्यात आला आहे. नाक्षत्रवेळेचे घडय़ाळ सौरवेळेच्या म्हणजे आपल्या नेहमीच्या घडय़ाळापेक्षा चार मिनिटे जलद धावते. सौरवेळेनुसार प्रत्येक तारा रोज चार मिनिटे लवकर उगवत असला तरी, नाक्षत्रवेळेनुसार तो रोज ठरावीक वेळेलाच उगवतो. कोणत्याही ठिकाणी वसंतसंपात बिंदू जेव्हा उत्तरबिंदू-शिरोबिंदू-दक्षिणबिंदू यांना जोडणाऱ्या रेषेवर म्हणजे मध्यमंडलावर येतो, तेव्हा त्या ठिकाणी नक्षत्रवेळेनुसार ‘शून्य वाजता’ नाक्षत्रदिवसाला सुरुवात होते. समजा, एखाद्या ताऱ्याचे विषुवांश दोन तास आहेत आणि क्रांती तीस अंश आहे. जगात कुठूनही या ताऱ्याचे निरीक्षण केले, तर त्या ठिकाणच्या नाक्षत्रवेळेनुसार जेव्हा दोन वाजतील, तेव्हा हा तारा तिथल्या मध्यमंडलावर आलेला असेल. क्रांती तीस अंश असल्याने, हा तारा वैषुविकवृत्ताच्या नेहमीच तीस अंश उत्तरेला असेल. वैषुविकवृत्ताच्या दक्षिणेला असणाऱ्या ताऱ्याची क्रांती ऋण चिन्हाने दर्शवली जाते.

दुसरी निरपेक्ष पद्धत म्हणजे आयनिक पद्धत. या पद्धतीत वैषुविकवृत्ताऐवजी, आयनिकवृत्त हे संदर्भवर्तुळ असते व वसंतसंपात बिंदू हा संदर्भबिंदू मानला जातो. या पद्धतीत मात्र दोन्ही संदर्भाक अंशांच्या स्वरूपात दिले जातात. वैषुविकवृत्त किंवा आयनिकवृत्त, तसेच वसंतसंपात बिंदू, यांची आकाशाच्या पार्श्वभूमीवरील स्थाने स्थिर असल्यामुळे, या दोन्ही पद्धतींतील संदर्भाक निरपेक्ष ठरतात. मात्र ग्रह वा ताऱ्याचे, निरीक्षणाच्या जागेवरून दिसणारे, एखाद्या ठरावीक वेळचे प्रत्यक्ष स्थान शोधण्यासाठी, या संदर्भाकांचे गोलीय त्रिकोणमितीच्या साहाय्याने स्थानिक संदर्भ पद्धतीतील संदर्भाकांत रूपांतर करावे लागते. सरावाने हे गणित करणे सोपे आहे.

– डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org