यास्मिन शेख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाक्य वाचा – ‘या सभागृहाचे बांधकाम जरी पूर्ण झाले असले, तरी इतर अनेक अनुषंगिक कामे अजून पूर्ण झालेली नाहीत.’ वरील वाक्यात एक चुकीचा शब्द योजल्यामुळे वाक्य सदोष झाले आहे. तो शब्द आहे- अनुषंगिक. मूळ शब्द आहे- अनुषंग. (संस्कृत, नाम, पुल्लिंगी) अर्थ- निकट, संबंध, संगती. या नामाला ‘इक’ प्रत्यय लागून विशेषण सिद्ध होते- आनुषंगिक. पहिले अक्षर ‘अ’ चा ‘आ’ होतो. आनुषंगिक या विशेषणाचा अर्थ आहे – तत्संबंधी, बरोबर येणारे, आवश्यक, आणखी, गौण. वरील वाक्यात ‘आनुषंगिक’ हे ‘कामे’ या नामाचे विशेषण आहे. सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले; पण इतर आनुषंगिक कामे- उदा. सभागृहाचे रंगकाम, सभागृहाची खुर्च्याची मांडणी, पंखे, दिवे, व्यासपीठावरील सामान व त्याची योग्य मांडणी इ. सभागृहातील इतर आवश्यक कामे पूर्ण झाली नाहीत, असा अर्थ अभिप्रेत आहे. मराठीत ‘अनुषंग’ हे नाम स्वतंत्रपणे वापरले जात नाही. फक्त एकच अपवाद- उदा. ‘तू जो विचार सांगितलास, त्या अनुषंगाने मला थोडा वेगळा विचार सांगायचा आहे.’ अनुषंगाने असे ‘ने’ प्रत्ययान्त रूप मराठी भाषेत योजलेले आढळते. ‘लोकसत्ता’च्या १३ सप्टेंबर २०२२ च्या अंकात दोन बातम्यांत ‘अनुषंगाने’ हा योग्य शब्द वापरलेला मी वाचला. शीर्षक- ‘आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू’ आणि ‘‘ज्ञानव्यापी’च्या सुनावणीचा मार्ग मोकळा.’’

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proper use of marathi word in sentence zws
First published on: 03-10-2022 at 02:23 IST