यास्मिन शेख

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाक्यांत योजलेल्या शब्दांची योग्य जागा बदलली, तर नीटसा अर्थ लक्षात येत नाही. अनेकदा बोलताना व लिखाण करताना शब्दयोजनेबद्दल काहीजण बेफिकीर असतात. मराठी भाषकांनी लेखनात मात्र शब्दांची योग्य जागी योजना करणे आवश्यक आहे. आता पुढी ल वाक्य वाचा -‘अचानक लोखंडी एक बंद केलेली पेटी मला रस्त्यावर पडलेली दिसली.’

ही वाक्यरचना सदोष आहे. शब्द चुकीच्या स्थानी योजल्यामुळे अर्थ नीटसा लक्षात येत नाही. ‘अचानक’ हा शब्द ‘बंद केलेली पेटी’ या संदर्भात आहे, असा ऐकणाऱ्याचा किंवा वाचणाऱ्याचा गों धळ होईल. ‘ती लोखंडी पेटी कोणी तरी  अचानक बंद केली’ असा अर्थ शब्दांची अयोग्य ठिकाणी योजना केल्यामुळे होतो. वास्तविक ‘अचानक’ या शब्दाचा लोखंडी पेटीशी काहीच संबंध नाही. ‘रस्त्यावर पडलेली पेटी मला अचानक दिसली.’ अशी वाक्यरचना योग्य होईल. म्हणजे ती पेटी कोणी अचानक बंद केली नसून ‘मला अचानक दिसली’ असे या वाक्यात सूचित करायचे आहे.

दुसरी चूक ‘लोखंडी एक बंद केलेली पेटी’ या वाक्यरचनेत आहे. ‘लोखंडी’ हे विशेषण ‘पेटी’ या नामाचे आहे. निर्दोष शब्दयोजना अशी हवी.-‘एक बंद केलेली लोखंडी पेटी’ किंवा ‘बंद केलेली एक लोखंडी पेटी’. त्यामुळे वरील वाक्य असे हवे-  ‘रस्त्यावर पडलेली बंद केलेली एक लोखंडी पेटी मला अचानक दिसली.’ किंवा ‘बंद केलेली एक लोखंडी पेटी रस्त्या वर पडलेली मला अचानक दिसली.’

‘इक’ प्रत्ययानंतरचे बदल..

 नामाला ‘इक’ प्रत्यय लागून होणारे काही तत्सम शब्द- (१) संकेत- सांकेतिक, शब्द- शाब्दिक, व्यवसाय- व्यावसायिक, अलंकार-आलंकारिक

(२) विचार- वैचारिक, विवाह- वैवाहिक, इतिहास- ऐतिहासिक

(३) उपचार- औपचारिक, बुद्धी- बौद्धिक, कुटुंब- कौटुंबिक

या शब्दांचे निरीक्षण केल्यास लक्षात येईल की, ‘इक’ प्रत्यय लागल्यास त्या शब्दातील पहिल्या अक्षरात बदल होतो. तो असा-

अ चा आ – उदा. सं, अ – सांकेतिक, आलंकारिक इ.

उ चा औ – उदा. बु, कु – बौद्धिक, कौटुंबिक इ. इ चा ऐ – उदा. वि, इ –  वैवाहिक, ऐतिहासिक इ.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proper use of marathi word marathi grammar marathi language learning zws