डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com
सध्या अनेक जण घरातून लॅपटॉपवर काम करीत आहेत. मनोरंजनासाठी टीव्ही किंवा स्मार्ट फोन वापरला जात आहे. माणूस या तीनही झगमगत्या पडद्यांकडे म्हणजे स्क्रीनवर पाहत असतो, त्या वेळी त्याच्या मेंदूत काय घडत असते याचे संशोधन झाले आहे. त्यानुसार, या पडद्यांवर होणारी हालचाल सतत पाहत राहिल्याने मेंदू भारला जातो. विचार करणाऱ्या भागाचा मेंदूतील अन्य भागांशी असलेला संबंध क्षीण होतो. त्यामुळे शरीरात काय होते आहे, याचे भान राहत नाही. टीव्ही पाहण्याचा कंटाळा येतो, पण तो बंद करावा असे वाटत नाही. स्मार्ट फोनबाबतही असे होते; त्यावरील समाजमाध्यमांवर वेळ चांगला जातो, पण ते बंद करून शरीराच्या हालचाली कराव्या असे वाटत नाही.
तंत्रज्ञानाने आपल्याला दिलेली ही सारी साधने चांगली आहेत, त्यांचे खूप उपयोग आहेत. मात्र त्यांचा ‘रिमोट’ आपल्या हातात आहे आणि तो आपल्या मेंदूला आणि डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी वापरायला हवा याचे भान ठेवायला हवे. माणसाचे डोळे हे दूरचे पाहण्यासाठी उत्क्रांत झाले आहेत. दूरचे पाहताना डोळ्यांतील स्नायू शिथिल असतात. त्यांना विश्रांती मिळते. माणूस लिहू-वाचू लागला, त्या वेळी अधिक वेळ जवळ नजर ठेवू लागला. सतत वाचन केल्यानेही डोळे दुखू लागतात, ते डोळ्यांचे स्नायू जवळचे पाहून थकतात म्हणून. डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी अधूनमधून दूरवर नजर टाकायला हवी. घरातून बाहेर पडायचे नाही याचा अर्थ घराबाहेर नजरही टाकायची नाही असा नाही. खिडकी-दरवाजातून दूरची झाडे, इमारती, दिसत असेल तर आकाशाकडे एक-दोन मिनिटे पाहिले की डोळे पुन्हा ताजेतवाने होतात. मात्र स्क्रीनसमोर असताना आपला मेंदू भारला जातो, त्यामुळे हे भान राहत नाही.
प्रत्येकाने सकाळी जागे झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला ‘स्क्रीन टाइम’ किती होतो, ते मोजायला हवे. शक्य होईल तितका तो कमी करायला हवा. या साऱ्या उपकरणांचा उपयोग आपण केवळ ऐकण्यासाठीही करू शकतो. गाणी, ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट डोळे बंद करून ऐकता येतात. सतत चमकणाऱ्या स्क्रीनवर नजर ठेवल्याने डोळ्यांना होणारा त्रास आणि मेंदूची त्रासदायक भारीत स्थिती यामुळे टाळता येते. तसेच संगणकावर काम करताना आपले लक्ष अधूनमधून श्वासावर, शरीरातील संवेदनांवर आणायला हवे. त्यामुळे मेंदूलाही विश्रांती मिळते.