समुद्र निरोगी आणि सुदृढ राखण्याचे काम करणारे खेकडे हे सफाई कर्मचारीच आहेत. जवळपास सर्वच विविध प्रकारच्या सागरी भौगोलिक अधिवासांत खेकडयांच्या विविध प्रजाती राहतात. त्यापैकी समुद्रकिनाऱ्यांवर हे सहज दृष्टीस पडतात. भरती-ओहोटीच्या पाण्यासोबत समुद्रातून जो जैविक गाळ वाहून येतो तो साफ करण्याचे काम विविध खेकडे करतात. त्यापैकी ‘रेती खेकडे’ (घोस्ट क्रॅब) किनाऱ्याच्या काठाने रेताड वाळूत बीळ खोदून राहतात. बिळांच्या जवळ आलेले आणि भरतीच्या पाण्यासोबत आलेले आकाराने मोठे असलेले मृत जीव खाऊन हे खेकडे किनारा स्वच्छ ठेवतात. एक तर सतत अस्थिर असलेल्या वाळूत जगणे सोपे नसते. दुसऱ्या बाजूने भक्षकांचा धोका असतो. सागरी पक्षी, भटके कुत्रे अशांपासून बचाव करण्यासाठी हे खेकडे वालुकामय रंगाचे छद्मावरण दर्शवतात. अति चपळाईने विचरण करणारी ही प्रजाती दिवसा बिळात राहून रात्री तसेच भरतीच्या वेळी सक्रिय होते. पाण्यापासून लांब राहताना हवेत श्वास घेता येण्यासाठी त्यांना त्यांचे कल्ले समुद्राच्या पाण्यात भिजवावे लागतात.

हेही वाचा >>> कुतूहल : महाराष्ट्रातील मासेमारी

रेतीचे छोटया बुडबुडयाप्रमाणे दिसणारे गोळे तयार करणारे (सँड बब्लर) खेकडे ओहोटीच्या वेळी किनाऱ्यापासून लांब पाण्याच्या जवळ असलेल्या लहान आकाराच्या वाळूत नक्षीदार वसाहती करतात. आकाराने अगदीच लहान असलेल्या या खेकडयांचे पोट म्हणजे एक छोटसे धुलाई यंत्रच असते. रेती खेकडे आणि इतर मोठया जीवांनी मोठया जैविक कचऱ्याचे विघटन केल्यानंतर वाळू आणि मातीमध्ये शिल्लक असलेला जैविक गाळ हे खेकडे खातात. हे करताना वाळूचे एकेक गोळे बनवून बिळाच्या भोवती ठेवून त्याची सुंदर नक्षी तयार करतात. चिखल्या किंवा तत्सम शिकारी पक्ष्याने हल्ला केल्यास या गोळयांच्या मधून सरळ बिळात जायला वाट मोकळी ठेवली जाते. सरतेशेवटी भरती येण्याआधी हे खेकडे वाळू आणि मातीने बिळाचे तोंड बंद करून बिळात हवेची पोकळी राहील अशा रीतीने बिळाचा दरवाजा बंद करून आत स्वत:ला कोंडून घेतात. भरतीच्या वेळी वाहून आलेले मत्स्य खाद्य हे खेकडे खातात. सफाई करणारे हे खेकडे अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक आहेत. परंतु वाढते पर्यटन, सूक्ष्म प्लास्टिक प्रदूषण यामुळे या प्रजाती धोक्यात आल्या आहेत.

– प्रा. भूषण वि. भोईर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org