‘दीप्ति-ओ-द्युति’ हा डॉ. सीताकांत महापात्र यांचा पहिला काव्य संग्रह सन १९६३ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर १९६७ मध्ये ‘अष्टपदी’ हा संग्रह प्रसिद्ध झाला. त्याला राज्य साहित्य अकादमी पुरस्कार, तर १९७१ मध्ये प्रसिद्ध झालेला ‘शब्दर आकाश’ याला केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. त्यांचे एकूण १३ कवितासंग्रह प्रसिद्ध झाले असून, प्रवासवर्णन, निबंध, शोधनिबंध संग्रहही प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी ‘सृजनशील कवीची शैली’ या त्यांच्या निबंध संग्रहालाही ओरिया साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहाने १९६३ मध्ये उडिया काव्यजगतात एका आधुनिक उडिया कवितेच्या विकासाचे अत्यंत अर्थगर्भ दर्शन घडवले.

ग्रीष्म ऋतूतील तिसरा प्रहर. संथ गतीने पालखीत बसून माहेर सोडून सासरी जाणाऱ्या नववधूची भावावस्था, दुडक्या चालीने छोटे छोटे श्वास घेणारे भोयांचे पदन्यास- नववधूच्या मनाच्या आंदोलनाबरोबर, ताल ठेवून बदलत जाणाऱ्या मन:स्थितीचे चित्रण करणारी त्यांची कविता आहे. धूसर वेळीचा गुलमोहर (१९६०)

अष्टपदी (१९६७) – काव्यसंग्रहात आठ प्रदीर्घ कविता आहेत. या प्रदीर्घ कवितांमध्ये प्राचीन दंतकथा आणि सार्वजनिक प्रतीकांना वेगळ्याच शैलीत काव्यबद्ध केले आहे.

आपल्या ओरिया राज्याची भौगोलिक आणि सांस्कृतिक भू-चित्रं आणि रम्य निसर्गचित्रं त्यांच्या काव्यात ठाशीवपणे वारंवार डोकावतात. त्यांच्या कवितेतील नायक हा सर्वसामान्य असहाय माणूस आहे, जो गळ्यापर्यंत चिखलात फसल्यावरसुद्धा आपली जिद्द न सोडता, निराश न होता, सतत संघर्षरत असतो. महापात्र यांचा जीवन आणि काव्याचा अनुभव समृद्ध आहे.

ओरिया भागवताचे कर्ते जगन्नाथदास आणि ओरिया भाषेतील अंध आदिवासी कवी भीमा भोई यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव आहे. पाश्चात्त्य काव्यातील सर्वोत्तमाची पारख आणि आदिवासी जनजीवनाशी असलेला त्यांचा घनिष्ट संबंध या साऱ्यांनी त्यांची संमिश्र आणि गहिरी काव्यसंवेदना घडविली आहे.

प्रेम आणि मृत्यू हे सख्ख्या शेजाऱ्यासारखे त्यांच्या कवितेत वावरतात. परस्परविरोधी अनुभव आणि प्रश्नाच्या संघर्षांचं विरोधाभासी रेखाटन करीत त्यांची प्रत्येक कविता एक स्वतंत्र प्रतीक बनते आणि एक परिपूर्ण घटना म्हणूनही स्वयंपूर्ण असते.

त्यांची कविता म्हणजे आत्मशोधाचा एक सघन प्रवास आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

हिमोसायटोमीटरचा वापर

हिमोसायटोमीटरच्या साहाय्याने एखाद्या द्रवाच्या नमुन्यातल्या पेशींचे मोजमापन करण्यासाठी सुरुवातीला हिमोसायटोमीटरवर विशेष प्रकारची आच्छादक काच ठेवली जाते. त्यानंतर ड्रॉपर किंवा केशनलिकेच्या साहाय्याने आच्छादक काचेच्या कडेला नमुन्यातला द्रव सोडण्यात येतो. हा द्रव केशाकर्षणाने हिमोसायटोमीटरच्या चौरस आखलेल्या खोलगट भागात शिरतो. त्यामुळे हा संपूर्ण भाग द्रवाच्या नमुन्याने भरून जातो. चौरस आखलेल्या भागाची खोली ०.१ मिलिमीटर असल्याने त्यामध्ये असलेल्या द्रवाचं आकारमान अचूकपणे सांगता येतं. द्रवाचा नमुना असलेल्या हिमोसायटोमीटरचं सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केलं जातं.

रक्ताच्या नमुन्यातल्या लाल रक्तपेशींचा आकार लहान असल्यामुळे त्या मोजण्यासाठी केंद्रस्थानी असलेल्या एक मिलिमीटर x एक मिलिमीटर आकाराच्या चौरसामध्ये आखलेल्या समान मापाच्या पंचवीस चौरसांपकी मध्यभागी असलेला एक आणि चार कोपऱ्यांत असलेले चार असे पाच चौरस विचारात घेतले जातात. या प्रत्येक चौरसाचं माप ०.२ मिलिमीटर  x ०.२ मिलिमीटर इतकं असतं. या पाच चौरसांमध्ये आखलेल्या प्रत्येकी सोळा सूक्ष्म चौरसांमध्ये किती लाल रक्तपेशी आहेत हे सूक्ष्मदर्शकाखाली पाहून चक्क  मोजलं जातं. मोजलेल्या एकूण लाल रक्तपेशींची बेरीज करून त्याला पाचने भागलं जातं. म्हणजेच ०.२ मिलिमीटर x ०.२ मिलिमीटर मापाच्या प्रत्येक चौरसात सरासरी किती लाल रक्तपेशी आहेत, हे काढलं जातं. हिमोसायटोमीटरच्या या एका चौरसाचं आकारमान लक्षात घेऊन त्यावरून प्रति घनमिलिमीटर आकारमानात किती लाल रक्तपेशी असतील, हे काढलं जातं. कधी कधी एखाद्या द्रवात पेशींची संख्या तुलनेनं खूपच जास्त असते. अशा वेळी तो द्रव विशिष्ट प्रमाणात विरल करावा लागतो.

अशा प्रकारे विरल केलेल्या नमुन्यातील पेशींची संख्या मोजण्यासाठी विरलन गुणांक लक्षात घेऊन त्यानुसार पेशींची संख्या काढली जाते. लाल रक्तपेशींचं मापन करण्यासाठीसुद्धा रक्ताचा नमुना विरल करून घ्यावा लागतो.

तपासणीसाठी दिलेल्या नमुन्यातल्या शुक्राणू; तसेच रक्तातील चपटय़ा रक्तपेशींच्या संख्येचं मोजमापनसुद्धा हिमोसायटोमीटरवर केंद्रस्थानी असलेल्या चौरसातले हेच पाच लहान चौरस वापरून केलं जातं.

लाल रक्तपेशींच्या तुलनेत पांढऱ्या रक्तपेशी आकाराने मोठय़ा असतात. त्यामुळे पांढऱ्या रक्तपेशींच्या मोजमापनासाठी हिमोसायटोमीटरवरील नऊ चौरसांपकी चार कोपऱ्यांमध्ये असलेल्या एक चौरस मिलिमीटर आकाराच्या चार चौरसांचा वापर केला जातो.

प्रिया लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sitakant mahapatra