एका फांदीवर असलेल्या सर्व पानांपर्यंत, सूर्यप्रकाश आणि हवेतले आवश्यक वायू, व्यवस्थित पोहोचावेत म्हणून फांदीच्या खालच्या बाजूची म्हणजे आधी उगवलेली पाने आकाराने जरा मोठी असतात तर वरच्या बाजूची थोडी लहान! याशिवायही फांद्यांवर पाने उगवत असताना एक अतिशय महत्त्वाची रचना, आकाराला येत असते. ही रचना भूमितीच्या कोनांचे सर्व नियम अगदी व्यवस्थित पाळून तयार होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समजा, एका वनस्पतीची एक फांदी आपण लक्षात घेतली. त्या फांदीवर पहिले पान उगवले. काही दिवसांनी पहिले पान थोडे मोठे झाल्यावर दुसरे पान फुटायला लागले, तर ते कुठे उगवेल? बरोबर पहिल्या पानाच्या वर? अजिबात नाही! दुसरे पान उगवण्याच्या काही शक्यता आहेत. पहिली शक्यता म्हणजे, दुसरे पान पहिल्या पानापेक्षा थोडे वर, पण पहिल्या पानाच्या अगदी विरुद्ध दिशेने उगवेल. म्हणजे पहिले पान आणि दुसरे पान यांच्यात १८० अंशांचा कोन असेल. असे झाले तर त्या फांदीवरचे तिसरे पान, पहिल्या पानाच्या वरती, अगदी त्याला समांतर असेल. म्हणजे दुसरे आणि तिसरे पान यांच्यात परत १८० अंशांचा कोन असेल. अशा प्रकारे पहिले पान ते तिसरे पान हे, पानांच्या रचनेचे, ३६० अंशांचे एक वर्तुळ, त्या फांदीवरती पूर्ण होईल. याला आपण द्विस्तरीय रचना म्हणू! 

कधी कधी एका फांदीवर पहिले आणि दुसरे पान यांच्यात १२० अंशांचा कोन असतो. मग दुसरे आणि तिसरे यांच्यातही १२० अंशांचा कोन आणि मग तिसरे आणि चौथे पान यांच्यात परत १२० अंशांचा कोन! अशा प्रकारे ३६० अंशांचे वर्तुळ पूर्ण करत चौथे पान पहिल्या पानाला समांतर असते आणि या रचनेला आपण तीनस्तरीय रचना म्हणू शकतो! 

तीच गत पहिले पान आणि दुसरे पान यांच्यात ९० अंशांचा कोन असेल तर फांदीच्या भोवती पानांचे चार स्तर तयार होतील. अशा प्रकारे सर्व वनस्पतींच्या, फांद्यावर उगवणारी पाने, भूमितीय पद्धत वापरत. सर्व पानांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी म्हणून रचना करत असतात. त्या त्या झाडाच्या पानांचे घाट आणि व्याप्ती, लक्षात घेत फांदीभोवती किती स्तरीय रचना असायला हवी याची भूमिती, ती ती वनस्पती ठरवते आणि आपल्याला थक्क करणाऱ्या रचना निसर्गत: आकाराला येतात.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

More Stories onनवनीतNavneet
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Structure of leaves mystery of leaf size lengths of leaves zws
First published on: 30-11-2022 at 02:19 IST