useful phrases in marathi language zws 70 | Loksatta

भाषासूत्र :  म्हणींचे काव्य

घागरीमध्ये सागर भरावा तसा मोजक्या शब्दांमध्ये व्यापक आणि सखोल जीवनार्थ साठवणाऱ्या म्हणी प्रतिभावंतांच्याच मेंदूतून जन्म घेत असतात.

भाषासूत्र :  म्हणींचे काव्य
(संग्रहित छायाचित्र)

नुकतेच ‘म्हणींचे काव्य’ हे एक जुने पुस्तक वाचनात आले. त्या पुस्तकाची प्रस्तावना प्रा. राम शेवाळकर यांनी लिहिली आहे. ते प्रस्तावनेत म्हणतात, ‘म्हणी म्हणजे त्या त्या भाषेतील सूत्रमय लोकवाङ्मय. माणसाचे शहाणपण म्हणींच्या रूपाने शब्दांच्या संपुटात साठवलेले असते. म्हणींमुळे बोलण्यातील अनावश्यक पाल्हाळाला आपोआप आळा बसतो. अभिव्यक्तीचे सामर्थ्य सर्वामध्येच असते असे नाही. अशांच्या सहायार्थ म्हणी आपुलकीने धावून येतात. घागरीमध्ये सागर भरावा तसा मोजक्या शब्दांमध्ये व्यापक आणि सखोल जीवनार्थ साठवणाऱ्या म्हणी प्रतिभावंतांच्याच मेंदूतून जन्म घेत असतात. यापैकी काही प्रतिभावंत सर्वज्ञात असतात तर असंख्य अज्ञात असतात. अशांची प्रतिभा म्हणींच्या रूपाने त्यांचे प्रतिनिधित्व करीत असते.’

‘म्हणींचे काव्य’ या पुस्तकात द. वि. गंधे यांनी काही म्हणींना ‘आर्या वृत्ता’त बांधण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे. त्यापैकी काही येथे उद्धृत करण्याचा मोह होतो आहे.

म्हण- ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’

झाकली आहे तोवरी सव्वा लाखाची मूठ ती समजा.

उघडी केल्यावरती तुमच्या टिकणार नाहीत हो गमजा

म्हण-‘म्हैस कोणाची आणि ऊठ बस कोणाला’

आहे म्हैस कोणाची होते ऊठ बैस कोणाला

दुनिया अशीच आहे, लाथ कुणाला अन् त्रास कोणाला

म्हण-‘सुपातले हसतात आणि जात्यातले रडतात’

हसतात ते सुपातील जात्यामधलेच ते रडतात

जाणीव काय तयांना जाणार सुपातालेही जात्यात

म्हण- ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?’

आडात नाही मुळीही पोहऱ्यामध्ये कुठोनि येणार

डोक्यात बुद्धी नाही त्याला सांगून काय होणार

म्हण- ‘साखरेचं खाणार त्याला देव देणार’

खाणार साखरेचा त्याला देणार देव हे नक्की

माती खाणाऱ्याच्या नशिबी मातीची ढेकळे पक्की

गंधे यांनी अशाप्रकारे पहिल्या ओळीत म्हण आणि दुसऱ्या ओळीत त्या म्हणीचा लाक्षणिक अर्थ काव्यात गोवून सांगितला आहे.

– डॉ. माधवी वैद्य

madhavivaidya@ymail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कुतूहल : निसर्गाचे देणे – चुंबक!

संबंधित बातम्या

भाषासूत्र : इंग्रजीतून आलेले तत्सम, तद्भव

व्हिडिओ

ताज्या बातम्या
अहो ऐकता का.. चोरट्या बाईने ‘हे’ एक वाक्य म्हणत सोनाराला घातला लाखोंचा गंडा; Video बघा आणि सावध व्हा
FIFA World Cup 2022 : कोरिया बाद फेरीत, उरुग्वेचे आव्हान संपुष्टात
FIFA World Cup 2022: अर्जेटिनाच्या मार्गात ऑस्ट्रेलियाचा अडथळा
मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींच्या मंजुरीमुळे दिलासा
न्यायवृंद व्यवस्था पारदर्शकच; ती कोलमडून पडू नये; सर्वोच्च न्यायालयाचे मत