कलकत्त्यात १७९३ साली ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या कार्यासाठी बाप्टिस्ट मिशनमार्फत आलेले इंग्रज धर्मोपदेशक विल्यम कॅरे यांचे भारतीय देशी भाषा प्रेम चकित करणारे आहे. कलकत्त्याजवळच असलेल्या श्रीरामपूर शहराच्या पंचक्रोशीतून वाहणाऱ्या गंगा आणि हुगळी या नद्यांमुळे संपन्न बनलेल्या प्रदेशात पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्लिश लोकांनी आपापल्या वखारी स्थापल्या होत्या. कॅरे यांनी डॅनिश वसाहतीत जागा घेऊन मिशनचे कार्य चालू केले. कलकत्त्यात असताना राम बसू यांच्या मदतीने कॅरे यांनी बंगाली भाषेचा सखोल अभ्यास करून ती आत्मसात केली होती. त्यामुळे पुढे श्रीरामपूरला धर्मोपदेश आणि प्रवचने ते प्रचलित बंगालीतच करीत. बंगालीच्या जोडीला त्यांनी संस्कृतचे अध्ययनही सुरू केले. संस्कृतचे व्याकरण आणि पुस्तके यांच्या वाचनानंतर त्यांनी या भाषेत वेद वाचण्याइतकी प्रगती केली. संस्कृतातले महाभारत वाचल्यानंतर तर कॅरे यांनी इतर भारतीय देशी भाषा शिकण्याचा ध्यासच घेतला.

विशेष म्हणजे श्रीरामपूरमध्ये मिशनचे काम करतानाच इ.स. १८०१ ते १८३० या काळात कॅरे कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये बंगाली, संस्कृत भाषा आणि पौर्वात्य संस्कृती या विषयांचे प्राध्यापक म्हणूनही काम करीत होते! ते या भाषांशिवाय इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक आणि हिब्रू या भाषांमध्येही पारंगत होते. पुढे त्यांनी मराठी, हिंदी, असामी या भाषाही आत्मसात केल्या.

भारतीय भाषांपैकी अनेक भाषांचे ज्ञान संपादन केल्यानंतर त्या भाषांमध्ये पुस्तके छापावीत अशी कल्पना कॅरे यांच्या मनात आली. त्या वेळी कलकत्ता येथे एक छापखाना विकाऊ असल्याचे कॅरे यांना समजल्यावर त्यांनी यंत्रसामुग्री विकत घेऊन श्रीरामपुरास चालू केला. छपाईसाठी टाइप आणि त्यांचे साचे तयार करण्याचे काम कलकत्त्याचे पंचानन आणि मनोहर या दोन कारागिरांनी केले. या दोघांनी बंगाली, देवनागरी, असामी, फारशी लिप्यांचे टाइप उत्कृष्टरीत्या तयार केले. कॅरे यांनी बायबलचा बंगालीत अनुवाद पूर्वीच करून ठेवला होता. छापखाना सुरू झाल्यावर १८०१ साली बायबलचा न्यू टेस्टामेंट म्हणजे नवा करार बंगाली भाषेत आणि लिपीत छापून त्यांनी प्रसिद्ध केला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com