भाषासूत्र : बऱ्याच लटपटींची ‘सर्कस’

या शब्दाची व्युत्पत्ती मोठी रोचक आहे. ‘सर्कल’ म्हणजे वर्तुळ या लॅटिन शब्दापासून ‘सर्कस’ हा शब्द आला.

circus
(संग्रहित छायाचित्र)

– भानू काळे

सर्कस हा मराठीसह बहुतेक भाषांत वापरला जाणारा शब्द. त्यासाठी प्रतिशब्द माझ्यातरी ऐकिवात नाही. करमणुकीचा हा एक आद्य आणि सर्वाधिक लोकप्रिय प्रकार. ‘द सर्कस मॅक्झिमम’ ही रोममधील सर्वात जुनी सर्कस. सुमारे दीड लाख लोक ती एकावेळी पाहू शकत.

या शब्दाची व्युत्पत्ती मोठी रोचक आहे. ‘सर्कल’ म्हणजे वर्तुळ या लॅटिन शब्दापासून ‘सर्कस’ हा शब्द आला. कारण जिथे सर्कस दाखवली जाते ती जागा वर्तुळाकार असते. कलाकारांचा संच आणि त्यांचे सादरीकरण या दोन्हीसाठी सर्कस हा एकच शब्द वापरला जातो. बऱ्याच लटपटी करून एखादे काम पूर्ण केले जाते तेव्हा त्यालाही ‘सर्कस’ म्हटले जाते.

फिलिप अ‍ॅस्टली हे इंग्रज गृहस्थ आधुनिक सर्कशीचे पितामह मानले जातात. त्यांनी १७७० मध्ये लंडन येथे सर्कशीचे प्रयोग सुरू केले आणि तेव्हापासून हा प्रकार जगभर गेला. ‘द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’ हा एका अमेरिकन सर्कशीवरचा चित्रपट खूप गाजला होता.

सर्कशीत काय नसते! वाघ, सिंह, हत्ती, घोडे, अस्वल, झेब्रा अशा विविध प्राण्यांच्या त्या प्रचंड तंबूत होणाऱ्या कसरती, बँडच्या तालावर त्यांच्याकडून खेळ करून घेणारा तो रुबाबदार रिंगमास्टर, त्याच्या हातातील सपकन वाजणारी ती छडी, जादूचे प्रयोग, सगळय़ांना हसवणारा विदूषक, तो मृत्युगोल आणि त्यातून भरधाव फेऱ्या मारणारे मोटरसायकल स्वार किंवा ट्रॅपिझ, म्हणजे उंचावर लटकणाऱ्या दोऱ्यांवरील कसरती, ज्या आम्ही लहानपणी जीव मुठीत धरून बघायचो. ‘वाघसिंह माझे सखेसोबती’ हे सर्कसवीर दामू धोत्रे यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे.

सर्कसचे महत्त्व व्लादिमिर लेनिनने जाणले होते. रशियन क्रांतीनंतर त्याने या लोककलेला बॅले किंवा ऑपेरा या उच्चभ्रू कलांच्या तोडीचे स्थान दिले; रशियाचा एक मानिबदू बनवले. रशियात सर्कशीतील प्राण्यांवर बंदी नाही. आजही मॉस्कोमध्ये सर्कशीचे दोन खेळ रोज होतात. ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातून राज कपूरने रशियन सर्कस भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. शाहरुख खाननेही पूर्वी (‘दूरदर्शन’च्या सुवर्णकाळात) ‘सर्कस’ ही चित्रवाणी  मालिका गाजवली होती.

सर्कशीत पडदा पडणे हा प्रकार नाही; त्यामुळे दोन खेळांमधील आवराआवर अगदी झपाटय़ाने होते. शिवाय एकच माणूस वेगवेगळी कामे करत असतो. ‘मराठी मासिक म्हणजे एका माणसाने चालवलेली सर्कस’ हे वर्णन किती सार्थ आहे हेही पुढे अनुभवाने समजले! 

bhanukale@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Word circus used in marathi languages history about word circus zws

Next Story
कुतूहल : चाक नव्हे, घडय़ाळ!
फोटो गॅलरी