आपलंसं वाटणं- मेंदूची, मनाची, व्यक्तिमत्त्वाची, समतोल भावनांची, आरोग्याची, निर्णयक्षमतेची, बुद्धीच्या समस्थितीची- केवढी मोठी गरज!

आपल्या मेंदूची जडणघडणच अशी असते, की आपल्याला इतर माणसांशी जोडून घ्यायला आवडतं; प्रेम करायला आवडतं, तसं प्रेम करवून घ्यायलाही आवडतं; आपलं कोणीतरी आहे, ही भावना आवडते. ज्या माणसांना लहानपणापासून घरात, शाळेत, समाजात प्रेम मिळत जातं,  त्यांना आयुष्याच्या अगदी सुरुवातीपासूनच ‘आपलेपणा’ या शब्दाचा अर्थही कळत जातो.

माझी अशी एक जागा आहे, माझ्यावर प्रेम करणारे जवळचे लोक आहेत, तिथं माझं निश्चितपणे ऐकलं जातं आणि माझं कोणीतरी आहे – ही भावना फार महत्त्वाची आहे. ती प्रत्येकाला मिळायला हवी. आयुष्यात जेव्हा वाईट प्रसंगांना सामोरं जाण्याची वेळ येते, तेव्हा याच भावना प्रचंड आधार देतात.

परंतु असा आपलेपणा प्रत्येकाच्या वाटय़ाला येत नाही. घरात सर्व वस्तू असतात, पण मानसिक दुरावा फार असतो. आणि काहींच्या वाटय़ाला घरच नसतं. अनेकांना आपलेपणाच्या शोधात राहावं लागतं. आपलेपणा माहीतच नाही, अशा मानसिकतेत जी मुलं मोठी होतात, त्यांच्या भावना फार वेगळ्या असतात.

कोणीतरी आपल्याला आपलं समजण्याची भावना आणि आहे त्या परिस्थितीत जुळवून घेण्याची भावना, या दोन्हीत बराच फरक आहे : (अ) सर्वाच्या मनात जेव्हा आपलेपणाची भावना असते; तेव्हा हे माहीत असतं की, आपण जसं आहोत तसं स्वीकारले जाणार आहोत. (ब) विशिष्ट पद्धतीनंच वागलं आणि परिस्थितीशी जुळवून घेतलं तरच स्वीकारले जाणार आहोत.. या दोन गोष्टी पूर्णच वेगळ्या आहेत.

आपल्यापैकी प्रत्येकाला हे माहीत असतं, की आपलेपणा कुठं मिळेल, आपण जसं आहोत तसं कुठं वागू शकतो? स्वभावातल्या गुण आणि दोषांसह विचित्रपणाही स्वीकारला जाईल, अशा जागा माणूस शोधत असतो आणि जिथं आपल्याला छान, हलकं आणि आपलंसं वाटतं त्यांच्याशी जोडले जातो.

वर्गात मुलांना आपलंसं वाटलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीनं शिकतात. सौहार्दपूर्ण वातावरणात माणसं जास्त चांगल्या पद्धतीनं काम करतात. अशा पद्धतीत अभ्यास करण्याची किंवा काम करण्याची ऊर्जा वाढण्याची शक्यताही असते. यासाठी किमान एक तरी आपलंसं वाटण्याची जागा प्रत्येकाकडे असली पाहिजे!

– श्रुती पानसे contact@shrutipanse.com