वसुलीसाठी पालघर विभागाची विशेष मोहीम

पालघर : महावितरण कंपनीच्या पालघर विभागांतर्गत दोन लाख ८८ हजार ४०८ ग्राहकांची थकबाकी रक्कम १०५ कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक थकबाकी घरगुती ग्राहकांची असून महावितरणतर्फे थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर विभागांतर्गत येणाऱ्या बोईसर (ग्रामीण), डहाणू, जव्हार, पालघर, बोईसर (औद्योगिक), सफाळे, तलासरी, मोखाडा व विक्रमगड हे उपविभाग असून दोन लाख ४१ हजार घरगुती ग्राहकांकडून ३७.७७ कोटी रुपये येणे थकीत आहेत. विभागातील ९२७ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या पथदिव्यांच्या देयकांची २३.११ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्याचबरोबरीने औद्योगिक परिसरातील सुमारे सहा हजार ग्राहकांची १७ कोटी रुपये थकीत आहे. शेतकी विभागातून १२९४२ ग्राहकांची १४.२९ कोटी रुपये शिल्लक असून वाणिज्य (९.१९ कोटी), पाणीपुरवठा (०.६३ कोटी) व इतर ३.३१ कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

उपविभागनिहाय थकबाकीमध्ये बोईसर ग्रामीण विभागाची थकबाकी ३३ कोटी रुपयांची असून डहाणू उपविभागात २०.८४ कोटी, पालघर उपविभागाची १९.७५ कोटी, तलासरी उपविभागाची ८.१२ कोटी, विक्रमगड विभागाची ७.३२ कोटी, सफाळे उपविभागाची ६.६५ कोटी, बोईसर औद्योगिक विभागाची ५.७१, जव्हार उपविभागाची १.८५ कोटी तर मोखाडा उपविभागाची १.९० कोटी रुपयांची थकबाकी आहे. विशेष पथकांचे आयुक्त थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, १ जून ते १५ जुलै या कालावधीमध्ये पालघर विभागातील सुमारे दोन हजार ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून इतर सात हजार ७२७ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे. दीड महिन्याच्या कालावधीत सुमारे दहा हजार थकबाकीदारांविरुद्ध कारवाई जाण्यात आली असून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सदोष मीटर बदलणे सुरू

पालघर विभागात जून महिन्यात झालेल्या बिलामध्ये ० ते ३० युनिट इतके रीडिंग दर्शविणाऱ्या २३ हजार ८३६ मीटर बदलण्याची विशेष मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. जूनमध्ये वितरित करण्यात आलेल्या बिलांपैकी ६१७४ मीटरमध्ये वापर असतानादेखील शून्य रीडिंग दाखवण्यात आले होते, तर १७ हजार ६६२ मीटरमध्ये वापरानंतर एक ते ३० युनिट इतकेच मीटर रीडिंग दाखवण्यात आले होते. यापैकी १४ हजार ८६६ मीटर हे फ्लॅश कंपनीचे असून आठ हजार ९७० मीटर रोलेक्स कंपनीचे असल्याची माहिती महावितरण दिली आहे. हे मीटर बदलताना ग्राहकाकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची महावितरण कंपनीने स्पष्ट केले आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 105 crore electricity arrears ssh