३३ हजार शेतकरी विम्याच्या रकमेपासून वंचित

पालघर : गेल्या ऑक्टोबरमध्ये अवेळी पडलेल्या पावसाने जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा केंद्रीय निधी उपलब्ध न झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात ३३ हजार १९२ शेतकऱ्यांना पीक विमा योजनेंतर्गत मिळणारी नुकसानभरपाईची रक्कमच मिळाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

योजनेमध्ये आतापर्यंत कर्जदार व बिगर कर्जदार असलेल्या ३४ हजार ८८९ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी सुमारे १६ हजार ७६७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली  आहे.  विमा संरक्षणामध्ये शेतकऱ्यांना ७२ कोटी ३१ लाख ६१ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसानीची तीन कोटी ९६ लाख १५ हजार रुपयांची रक्कम प्राप्त  आहे.  केंद्र सरकारकडून मिळणारा निधी अजूनही मिळाला नसल्याने शेतकरी या विमाच्या प्रतीक्षेत आहेत.  जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत २०२०-२१ मध्ये भात, नाचणी, उडीद या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून विमा संरक्षित रक्कम एक कोटी ४६ लाख १८ हजार  रुपये घेण्यात आली. गेल्या वर्षी १८ हजार ८३५ कर्जदार शेतकरी व १६ हजार ५४ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेतला होता. या शेतकऱ्यांनी एक कोटी ४६ लाख १८ हजार रुपये विमा हप्ता रक्कम म्हणून बँकेत भरणा केलेली आहे. विमा संरक्षित रक्कम ७२ कोटी ३१ लाख ६१ हजार इतकी आहे. मात्र आतापर्यंत तीन कोटी ९६ लाख १५ हजार इतकीच रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त झालेली आहे. याप्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षक काशिनाथ तरकसे यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पीक विमा योजनेत समाविष्ट शेतकरी

* सहभागी शेतकरी : ३४ हजार ८८९ रु.

* विमा संरक्षित क्षेत्र: १६ हजार ७७६.२४ हेक्टर

*’ विमा संरक्षित रक्कम: ७२ कोटी ३१ लाख ६१ हजार  रुपये

* विमा हप्ता भरलेली रक्कम: एक कोटी ४६ लाख १८ हजार

आतापर्यंत पीक विमा योजनेअंतर्गत झालेले वाटप

* शेतकरी संख्या: १६९७

* विमा संरक्षित क्षेत्र: ८७४.५२

* प्राप्त झालेली विमा रक्कम: तीन कोटी ९६ लाख १५ हजार

अशी आहे रक्कम

भाताला हेक्टरी ९१० रुपये, नाचणीला ४०० रुपये तर उडदाला ४०० रुपये विमा संरक्षित रक्कम ठरवण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या क्षेत्रानुसार ही विमा संरक्षित रक्कम बँकेत जमा करावयाची आहे. नुकसानभरपाई झाल्यानंतर विमा कंपनीच्या ठरवलेल्या नियमानुसार नुकसान भरपाईचे पंचनामे करून भाताचे नुकसान झाल्यास भात पिकाला हेक्टरी ४५००० नुकसानभरपाई, नाचणी व उडदाला हेक्टरी २० हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाते.