विजय राऊत

कासा : जव्हार तालुक्यातील मोखाडा हद्दीवरील भुरीटेक ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. येथून जाताना रुग्ण, वयस्क आणि नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. भुरीटेक नांदगाव परिसरात पाटीलपाडा, पाथर्डी , बोटोशी, बेलपाडा, मसनेवाडी, रामवाडी, असे गाव-पाडे असून, ३ हजार ४०० च्या आसपास लोकवस्ती असलेला परिसर आहे. मात्र भुरीटेककडे जाणाऱ्या  रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम ३० वर्षांपूर्वीच झाल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. परंतु रस्त्यावरील डांबर गायब झाले आहे. रस्त्यावर सर्वत्र खडी, मातीचेच साम्राज्य दिसत आहे. 

रस्त्यांच्या अशा अवस्थेमुळे या भागातील ग्रामस्थांना शासनाच्या सुविधांसाठी तालुक्याच्या अथवा कार्यालयांच्या ठिकाणी पोहोचणे अवघड झाले आहे.  येथे जवळपास कोणतीही आरोग्य सुविधा नाही. त्यामुळे सर्प दंश किंवा तत्सम घटना घडल्यासही रुग्णांना प्राथमिक उपचारांसाठी १७किमीवरील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. परंतु या रस्त्यावरील खडय़ांतून मार्ग काढताना रुग्ण आणि नातेवाईकांची दमछाक होते. अत्यवस्थ रुग्ण आणि गरोदर मातांचे प्रचंड हाल होत आहेत. येथील विद्यार्थी जव्हार किंवा नांदगावच्या आश्रम शाळेतून ये-जा करतात, त्यांनाही रस्ता वाईट असल्याने शाळेत वेळेवर पोहोचण्यात अडचणी येतात. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.  परंतु या रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, असे मोखाडा उपविभागीय अभियंता अहिरेकर यांनी सांगितले. 

गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करूनही बांधकाम विभाग आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देत आहे. लवकरात लवकर रस्ता करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची इच्छा आहे.

अजय बुरकुड (ग्रामस्थ)