खरेदीचा हंगाम संपला तरी घोषणा नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी 

पालघर : भात उत्पादक शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाला भात विक्री केली असली तरी राज्य शासनाने खरेदीवरील बोनस अजूनही जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. तात्काळ बोनस जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. गेल्या वर्षी भात खरेदीचा हंगाम सुरू होताच राज्य सरकारच्या वतीने बोनस जाहीर करण्यात आला होता. शेतकऱ्याला प्रति ५० क्विंटल भाताच्या मर्यादेत सातशे रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना भातासाठी  २७४० रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला होता. चांगला दर मिळाल्याने मोठय़ा प्रमाणात भात विक्री शेतकऱ्यांनी केली होती. केंद्र सरकार पुरस्कृत योजनेतून भाताला १९ रुपये चाळीस पैसे प्रति किलोचा दर दिला जातो. यात दरवर्षी राज्य सरकारच्या माध्यमातून आदिवासी विकास महामंडळामार्फत सात रुपये प्रति किलो इतका बोनस दिला जात आहे. मात्र यंदा भात खरेदीची मुदत संपली तरीही राज्य शासनाकडून कडून बोनस जाहीर करण्यात आला नाही. यंदा भात खरेदीची मुदत दोन महिन्यांनी घटवण्यात आली होती. त्यामुळे दोन महिने आधीच भात खरेदी बंद करण्यात आली होती. महामंडळाच्या आधारभूत भात खरेदी केंद्रांवरील भात खरेदीची मुदतही वाढवण्याची मागणी केली जात आहे.

यंदाच्या हंगामात भात खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांवर ऑनलाइन नोंदणी, सातबारा उताऱ्यावर चालू वर्षांची पीक पाहणीची नोंदीसारख्या जाचक अटी शर्ती लादण्यात आल्या होत्या. अटी शर्तीच्या पूर्ततेअभावी अनेक शेतकऱ्यांना महामंडळाच्या भात खरेदी केंद्रांवर भाताची विक्री करता आली नसल्याची माहिती पुढे येत आहे. आदिवासी विकास महामंडळाकडून केल्या जाणाऱ्या आधारभूत भात खरेदीला राज्य सरकारकडून एका आठवडय़ाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी केंद्रांवर ८ फेब्रुवारीपर्यंत भाताची खरेदी केली जाणार आहे. फेब्रुवारीनंतर गरज भासल्यास भात खरेदी करणाऱ्या संस्थाची खात्री करावी, त्यानंतर भात खरेदी न झाल्याची कारणे नमूद  तालुकानिहाय प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्याबाबत आदिवासी विकास महामंडळाला कळविण्यात आले आहे. ३१ जानेवारीच्या मुदती अखेर आदिवासी विकास महामंडळाच्या मनोर कार्यालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सहा भात खरेदी केंद्रांवर ५ कोटी २७ लाख ३३ हजार ४६४ रुपये किंमतीच्या  २७ हजार ८१२ क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली आहे.