वाचन संस्कृती रुजविण्यासाठी उर्दू शाळांतील शिक्षकांचे प्रयत्न

पालघर : पालघरमधील उर्दू शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वाचनप्रवृत्त करण्यासाठी आओ किताब से दोस्ती करेंह्ण (चला, पुस्तकांशी मैत्री करू या) ही वाचन मोहीम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या पुस्तकांशी असलेल्या मैत्रीत काहीसा खंड पडला आहे. मोबाइलमुळे पुस्तकविश्वाकडे मुलांची पाठ फिरली आहे.  मुलांची पुन्हा पुस्तकांशी मैत्री होण्यासाठी अखिल भारतीय कल्पक शिक्षक संघटना (एआयआयटीए) उर्दू शाळांमध्ये विद्यार्थ्यांना साहित्य संपदेची  ओळख करून देत, वाचन संस्कृती रुजवण्याचे काम करत आहे.

महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेत परिसंवाद, ऑफलाइन वाचनाच्या गुणवत्तेवर चर्चा, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने सुरू झालेले फिरते वाचनालय आणि वर्गखोल्यांमध्ये पुस्तकांची निर्मिती यांचा समावेश आहे. त्याचबरोबर मुलांच्या आवडीची पुस्तके, गोष्टी आदीच्या पिशव्या शाळांच्या दारांत ठेवून आल्याआल्याच मुलांना पुस्तके भेटतील अशी व्यवस्था केली जात आहे. फिरत्या वाचनालयातून मुलांनी जास्तीतजास्त पुस्तके घ्यावीत, यासाठी किताबें पढो, इनाम पाओ (पुस्तके, साहित्य वाचा, पुरस्कार मिळवा)ह्ण सारख्या स्पर्धाही घेण्यात येतात. पाठय़पुस्तकांच्या पलीकडील जग समजून घेण्यास ही मोहीम विद्यार्थ्यांना मदत करेल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष तन्वीर अहमद अन्सारी यांनी व्यक्त केला.

पालघर जिल्ह्यातील खासगी व शासकीय अशा ३० शाळा व महाविद्यालयांमधून सुमारे दोन हजार आठशे विद्यार्थ्यांना या मोहिमेमध्ये सामावून घेतले जाणार आहे. उर्दू साहित्य, विज्ञान, नाटक अशा अनेकविध पुस्तकांचा त्यात समावेश आहे. शिवाय गोष्टीचा शनिवारह्ण या शासनाच्या मोहिमेलाही चालना देण्यात येत आहे. गटागटांमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्यास याचा फायदा होईल, असे मोहिमेचे समन्वयक आसिफ अली शाह यांनी सांगितले.