कासा : डहाणू तालुक्यातील कासा गाव तसेच आजूबाजूचे चारोटी, तलवाडा सायवन आदी ग्रामीण भागांत विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण कंपनीकडून अत्यंत अनियमितपणे भारनियमन करण्यात येते आहेच, शिवाय वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडली आहे. वेळेवर वीज बिल न भरल्यास कर्मचारी लगेचच वीज कापण्यास धावतात, मग न सांगता, वेळीअवेळी वीज गायब होते तेव्हा हेच कर्मचारी, अधिकारी कुठे असतात, असा सवाल रहिवाशांनी केला आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्र भारनियमनमुक्त होण्याची घोषणा करण्यात आली होती. तिचे पुढे काय झाले, अशीही विचारणा केली जात आहे. एकतर वातावरणात उष्मा वाढला आहे. तापमानाचा पारा चाळिशीच्या वरच आहे, त्यातच वीज गायब झाल्याने तर नागरिक हैराण आहेत.
वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, उन्हाळय़ात विजेचा लोड वाढतो आणि वीज संयंत्रे ट्रिप होतात, परंतु ग्रामस्थांना हे मान्य नाही. कासा, चारोटी भागात वीजबिल भरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, तरीही येथे वीजपुरवठा अनियमित असल्याने नागरिक चांगलेच वैतागले आहेत.
गेल्या काही दिवसांत तर सलग बारा-बारा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही भागांत विद्युत वाहिन्यांच्या कमीअधिक दाबामुळे विद्युत उपकरणांचेही नुकसान झाले आहे. मात्र महावितरण कंपनीला या सगळय़ाशी आणि नागरिकांच्या त्रासाशी काहीच देणेघेणे नसल्यासारखाच त्यांचा कारभार सुरू आहे, असे दिसते.
संग्रहित लेख, दिनांक 31st Mar 2022 रोजी प्रकाशित
कासा परिसरात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त; सर्वाधिक वीजबील भरणाऱ्या भागातच वीज गायब
डहाणू तालुक्यातील कासा गाव तसेच आजूबाजूचे चारोटी, तलवाडा सायवन आदी ग्रामीण भागांत विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-03-2022 at 02:02 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens affected power outage casa area electricity disappears area electricity bills paid amy