प्रभागांमधील नाल्यांमध्ये गप्पी मासे सोडणार

पालघर : पालघर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये मोठय़ा प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव आहे. ही बाब लक्षात घेत नगर परिषदेने उघडय़ा गटारांमध्ये व सांडपाण्याच्या ठिकाणी तसेच पाणी साचलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे शहरातील डासांचा प्रादुर्भाव कमी होईल असा विश्वास नगर परिषदेने व्यक्त केला आहे.

पालघर नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधींमार्फत त्यांच्या प्रभागांमध्ये विविध ठिकाणी  गप्पी मासे सोडण्यात येणार आहे. उघडय़ा गटारांमध्ये डासांचा मोठा प्रादुर्भाव आढळून येतो. या पार्श्वभूमीवर प्राधान्यक्रमाने उघडय़ा गटारांमध्ये, सांडपाणी साचलेल्या ठिकाणी नगरसेवक नगरसेविका यांना नगर परिषदेमार्फत गप्पी मासे पुरवले जाणार आहे.  डासांच्या अळय़ा ह्या गप्पी मासे यांचे खाद्य असल्याने डासांची उत्पत्ती थांबणार आहे. आपल्या इमारतीचे, घराच्या सांडपाणी साठवणूक टाक्या स्वच्छ ठेवा, त्यात डासांच्या अळय़ा तयार होऊ नये यासाठी उपाययोजना करावी तसेच ज्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव आहे. त्या ठिकाणी नगरपरिषदेला कळवल्यास तिथे आणखीन जोमाने उपाययोजना करून व फवारणी करून डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यास नगर परिषद पुढाकार घेईल, असे नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. गप्पी मासे सांडपाण्यात सोडताना नगराध्यक्ष यांच्यासह विरोधी पक्षनेते भावानंद संखे व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या.