पालघर : तलासरी (वेवजी) येथील एका विकासकाने बनावट भोगवटा प्रमाणपत्राच्या आधारे सदनिका, बंगल्यांची नोंदणी केल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्परतेने चौकशी करून १२ तासांत संबंधित विकासकाविरुद्ध घोलवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वेवजी येथील मे. बी नानजी इंटरप्राईजेस लिमिटेड या कंपनीमार्फत भोगवटा प्रमाणपत्रासाठी केलेला अर्ज तत्कालीन तहसीलदार यांनी निकाली काढून जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित प्रमाणपत्र घेण्याचे सूचित केले होते. त्यानंतर तहसीलदार यांची बनावट सही, शिक्का व लेटर हेडचा वापर करून बनावट भोगवटा प्रमाणपत्र तयार केले. त्या अनुषंगाने दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदवली हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर शासनाची फसवणूक केल्याची तक्रार तलासरीच्या मंडळ अधिकारी यांच्यामार्फत घोलवड पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी पहाटे ३ वाजता करण्यात आली.
जव्हार प्रकरणातील चौकशी अंतिम टप्प्यात
जव्हार येथील सूर्य तलाव सुशोभीकरण प्रकल्प तसेच नगर परिषदेतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामांमध्ये बनावट सही- शिक्का यांच्या आधारित बोगस तांत्रिक मान्यता प्रमाणपत्र तयार आल्याचे निष्पन्न झाले आहे. जव्हार परिसरात १५ कोटी रुपयांहून अधिक विकास कामांमध्ये अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचे आरोप गेल्या चार-पाच महिन्यांपासून होत आहेत. या प्रक्रियेत जिल्हा प्रशासनाची फसवणूक झाली असताना जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष का करीत आहे, अशी विचारणा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असता या प्रकरणात जव्हारच्या साहाय्यक जिल्हाधिकारी यांच्यामार्फत चौकशी सुरू असल्याचे डॉ. माणिक गुरसळ यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. या प्रकरणात साहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी सिंग यांच्याशी संपर्क साधला असता जव्हार नगर परिषद संदर्भातील गैरप्रकारांबाबत चौकशी अंतिम टप्प्यात असून आठवडाअखेरीपर्यंत याबाबतचा अहवाल सादर करून दोषी व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यासाठी शिफारस करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जव्हार नगर परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील उघडकीस आलेल्या गैरप्रकारांबाबत येत्या काही दिवसांत गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
