निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात, काम महिनाभरात सुरू होणार
पालघर : पालघर नवनगरमधील जागेत जिल्हा सामान्य रुग्णालय उभारणी कामाच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. रुग्णालय उभारण्याचे काम महिना-दीड महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. या कामासाठी चार ठेकेदारांनी काम करण्यास उत्सुकता दाखवली असून त्याच्या पात्रतेसंदर्भातील पडताळणी सुरू झाली आहे. नंडोरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत जिल्हा सामान्य रुग्णालय उभारणीसाठी नवनगर संकुलातील दहा एकर जागा वर्ग करण्यात आली आहे. या रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंत उभारताना रोड मार्जिन व लगत असणारे विद्युत वाहिनी खांबांचा अडथळा आला होता. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान या विभागांमध्ये समन्वय साधण्यात आला असून रस्त्यापासून खुल्या जागेचे अंतर सोडण्याबाबत निर्णय झाला आहे.
७५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे सामान्य रुग्णालयाचे बांधकाम करण्यासाठी सुमारे २०९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून यासाठी निविदा स्वीकारण्याचे काम २३ डिसेंबपर्यंत करण्यात आले. निविदा खुल्या करून काम करण्याची तयारी दाखविलेल्या चार ठेकेदारांच्या कागदपत्रांची पडताळणी व त्या पुढील प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. या कामासाठी ठेकेदार निश्चिती येत्या महिन्याभरात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामाला सुरुवात करण्यास दीड महिन्याचा अवधी लागेल असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे काम दोन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करावयाचे असून या दहा एकर क्षेत्रफळाच्या तीन बाजूला संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुलभता
वैद्यकीय महाविद्यालय उभारणी करण्यासाठी पाच किलोमीटर परिसरात ३०० खाटांच्या रुग्णालयाची आवश्यकता असून जिल्हा सामान्य रुग्णालयात दोनशे खाटांची उपचार व्यवस्था उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. याशिवाय याच परिसरातील पाच एकर जागा महिला रुग्णालयासाठी देण्यात आली असून त्या ठिकाणी १०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित आहे. या दोन्ही रुग्णालयांची उभारणी झाल्यानंतरच पालघरला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होऊ शकेल अशी स्थिती आहे.