पालघर : पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात राष्ट्रीयीकृत बँका उदासीन असल्याची, खंत कृषीमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बियाणे, रासायनिक खते यांची साठेबाजी करणाऱ्या आणि बोगस बियाणे वितरित करणाऱ्या वितरकांवर कठोर कारवाईचे संकेत त्यांनी दिले. येत्या खरीप हंगामासाठी गाव विकास कृती समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे खरीप हंगामाचा आढावा आणि आराखडा तयार केला जातो आहे. आवश्यक असलेली बियाणे, खते व निविष्ठा यांची कमतरता भासणार नाही, याचे नियोजन तयार करण्यात आले असल्याचे भुसे म्हणाले. केंद्र शासनाकडे महाराष्ट्रासह पालघर जिल्ह्यासाठी ५२ लाख मेट्रिक टन बियाणे आदींची मागणी केलेली आहे. त्यातील ४५ लक्ष मेट्रिक टन आवंटन केंद्राने मंजूर केलेले आहे. ठरलेल्या वेळेप्रमाणे व मंजूर प्रमाणात ते उपलब्ध व्हावे अशी विनंती केंद्राकडे केली असून केंद्रही याबाबत सकारात्मक असल्याचे माहिती पालकमंत्री भुसे यांनी दिली.
महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेंतर्गत बीडमध्ये सुरू केलेल्या पीक विमा योजनेच्या मॉडेलची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. या मॉडेलमध्ये विमा कंपन्यांना १० टक्के नफा घेता येईल व नुकसान झाल्यास १० टक्के नुकसानभरपाई सोसावी लागेल. उर्वरित रक्कम राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्याचे प्रयोजन असेल. त्यामुळे हे मॉडेल व योजना महाराष्ट्रभर लागू करण्याची विनंती केंद्राकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यात रासायनिक खतांचा गैरवापर, चुकीची बोगस बियाणे तसेच भेसळ व गैरप्रकार होऊ नये, याबाबत सतर्क राहण्याच्या व लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे प्रकार घडल्यास दुकानदाराऐवजी त्या कंपनीवर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आणि तातडीने त्यांना काळय़ा यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही भुसे यांनी दिले आहेत. परिसरातील फळझाडे आणि वाणांना जी आय मानांकन प्राप्त करून देण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. तसेच सेंद्रिय खतांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून प्रोत्साहनपर योजना राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेत जि.प. अध्यक्ष वैदेही वाढाण, खा. राजेंद्र गावित, आ. सुनील भुसारा, आ. श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव, गंगाधर जामनिक अधिकारी उपस्थित होते.
गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश
पालघर जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या बांध-बंदिस्ती, मजगी अशा कामांमध्ये गैरव्यवहार झाला असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल, अशी खात्री भुसे यांनी दिली. शिवाय पालघर जिल्ह्यातील विकास, प्रकल्प, शासकीय योजनांची माहिती सविस्तर पत्रकार परिषदांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आदेशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.