डहाणू : तलासरी तालुक्यातील वेवजी सिंगलपाडा येथील बेकायदा माती उत्खनन, दगड खदान, क्रशर, तात्काळ बंद करून यंत्रसामुग्री व वाहने यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सरपंच सरिता उराडे यांनी तलासरी तहसीलदारांकडे केली आहे. तलासरी तालुक्यातील वेवजी हे पूर्ण गाव पेसा गावाच्या क्षेत्रात आहे, परंतु येथे पेसा ग्रामसभेची कोणतीही परवानगी न घेता परस्पर खदान चालकातर्फे माती उत्खनन सुरू आहे. त्यातून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवला जात आहे. तर भरधाव वाहनामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर सिगल पाडा, काटेल पाडा येथील घरांनाही तडे गेले आहेत. ग्रामस्थांना या खदानीमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. महसूल विभागाने याविषयी कारवाई करून बेकायदा खदानी काम बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वेवजी येथील ही बेकायदा खदानी बंद न झाल्यास आंदोलनाची तयारी असल्याचे सरपंच उराडे यांनी सांगितले.
पेसा ग्रामसभेच्या परवानगीशिवाय सुरू असलेले खदानी काम तात्काळ बंद करून यंत्रसामुग्री, वाहने जप्त करत कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
-सरिता उराडे, वेवजी (सरपंच)
