डहाणू शहरात वाट्टेल तशा पद्धतीने वाहने उभी केल्यामुळे रहिवाशांना चालणेही कठीण
डहाणू : डहाणू शहरात मर्यादित अरुंद रस्ते आणि वाढत्या नागरीकरणामुळे रहदारीवर ताण पडत आहे. बाजारपेठेत वाहनतळ नसल्याने वाहतुकीची समस्या जटिल बनली आहे. डहाणू इराणी रोड, थर्मलपावर मार्ग, सागरनाका मार्गावरील दुकानांसमोर वाहने उभी करण्याची व्यवस्था नसल्याने रहिवाशांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागत आहेत. त्यातच वाहतूक पोलिसांचा हस्तक्षेप नसल्याने बेशिस्त वाहनांमुळे डहाणू शहराची वाहतूक समस्या जटिल बनलेली आहे. इराणी रोड, थर्मल पॉवर मार्गावर संध्याकाळच्या सुमारास बेशिस्त वाहनांमुळे रहिवाशांना वाट काढताना दमछाक होत आहे.
डहाणू रेल्वे स्थानकात सकाळ आणि संध्याकाळी रेल्वे प्रवाशांची मोठी धावपळ असते. यावेळी डहाणू स्टेशन परिसरात दोन्ही मार्गावर बेशिस्त वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. वाहने रस्त्यावर उभी केल्यामुळे या रस्त्यावरून जाताना पादचाऱ्यांसह अनेक वाहनचालक धडपडले आहेत. पारनाका येथे दिवसेंदिवस वाढणाऱ्या हातगाडय़ांवर खरेदीदारांकडून रस्त्यालगत वाहने उभी केली जात आहेत. वाहनकोंडी सोडवण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
डहाणू शहरात तालुका मुख्यालय, तहसीलदार कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, बँका, बस आगार, विद्यालय, महाविद्यालये, डहाणू समुद्रकिनाऱ्यावर बाहेरून अनेक रहिवासी डहाणूला येत असतात. दरम्यान वाहनचालकांच्या भरधाव वेगामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांना शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. वाहनतळ तयार केले आहेत. तसेच नियम आखून दिले आहेत.
– वैभव आवारे, मुख्याधिकारी, डहाणू नगर परिषद