रस्त्याअभावी गरोदर महिलेचा खडतर प्रवास ; पाचघर ग्रामस्थांच्या वेळीच मिळालेल्या मदतीने मोखाडा घटनेची पुनरावृत्ती टळली

मंगळवारी येथील एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिला दवाखान्यात नेण्याचा मोठा कठीण प्रसंग उद्भवला होता.

रस्त्याअभावी गरोदर महिलेचा खडतर प्रवास ; पाचघर ग्रामस्थांच्या वेळीच मिळालेल्या मदतीने मोखाडा घटनेची पुनरावृत्ती टळली
वाडा तालुक्यातील मौजे पाचघरमध्ये रस्ता नसल्यामुळे  येथील एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात नेताना तिच्या नातेवाईकांचे हाल झाले.

वाडा : वाडा तालुक्यातील मौजे पाचघरमध्ये रस्ता नसल्यामुळे  येथील एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात नेताना तिच्या नातेवाईकांचे हाल झाले. येथील ग्रामस्थांनी वेळीच मदत केल्यामुळे  मोखाडा तालुक्यात उपचारांअभावी जुळय़ा बालकांचा (अर्भक) मृत्यू झाल्याच्या घटनेची पुनरावृत्ती टळली. मात्र या खडतर प्रवासाबाबत प्रशासनाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

वाडा, जव्हार, मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावपाडे अनेक सोयी, सुविधांपासून आजही वंचित आहेत. विशेषत: अनेक ठिकाणी जायला रस्ते नसल्याने पावसाळय़ात येथील रुग्णांना डोली करून दवाखाना गाठावा लागत आहे.

मंगळवारी येथील एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिला दवाखान्यात नेण्याचा मोठा कठीण प्रसंग उद्भवला होता. येथील पन्नासहून अधिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन अथक परिश्रम करून दोन किलोमीटर चिखलाच्या रस्त्यावरून एक चारचाकी वाहनातून  या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात  सुरक्षित पोहोचविले. वाहनाला धक्का देत आरोग्य केंद्रापर्यंत आणावे लागले होते.  संपूर्ण जंगल भागात असलेल्या पाचघर या गावात जाण्यासाठी आजही रस्ता नाही. या भागातील आमदार दौलत दरोडा यांच्या प्रयत्नांमुळे तीन किलोमीटर रस्त्याचे काम झालेले आहे. उर्वरित रस्ता वन विभागाच्या जागेतून जात असल्याने या ठिकाणी  डांबरीकरण करण्यासाठी वन विभागाने हरकत घेतल्याने  काम अपूर्ण स्थितीत आहे.  त्यातच दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे रस्त्याचा चिखल झाला आहे. वन विभागाच्या जाचक अटींमुळे  ओगदा, परळी, गारगांव या जंगलपटृटीतील अनेक रस्ते, प्रकल्प रखडले आहेत.  –रोहिदास शेलार, सामाजिक कार्यकर्ता, परळी विभाग. ता. वाडा

वन विभागाचे दत्तक गांव

पाचघर गाव परिसर हा वन विभागाच्या वन्य जीव संरक्षण राखीव जंगल क्षेत्रात येतो. या परिसरातील जंगल सुरक्षित रहावे म्हणून येथील पाचघर हे चारशे लोकवस्ती असलेले गाव वन विभागाने दत्तक घेतले आहे. या दत्तक घेतलेल्या गावातील रस्ताच वन विभागाने अडवून सावत्रपणा दाखविल्याने पाचघर ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नगर परिषद समांतर कार्यालय प्रकरणात गुन्हा दाखल नाही ; तक्रारीला तीन वर्षे 
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी