करोनाकाळात किसान रेल बागायतदारांसाठी लाभदायक

पालघर: चिकूची वाहतूक डहाणूपासून दिल्लीपर्यंत सवलतीच्या दरात किसान रेलमार्फत गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.  वर्षभरात डहाणू परिसरातील तब्बल ३५ हजार टन चिकूची वाहतूक माफक दरात दिल्लीपर्यंत करण्यात आली असून करोना व नंतर उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत ही सेवा बागायतदारांना वरदान ठरली आहे. २८ जानेवारी २०२१ पासून किसान रेल्वे सेवेची डहाणू येथून सुरुवात झाली. आरंभी डहाणू येथून सहा डबे व उर्वरित डबे गुजरात राज्यातून भरून ही गाडी २२ ते २४ तासांत दिल्ली येथे पोहोचत असे. कालांतराने  उत्पन्न वाढल्यानंतर डहाणू येथून अनेकदा वीस डब्यांची गाडी पूर्णपणे भरून ही विशेष मालसेवेची गाडी दिल्लीपर्यंत २०-२१ तासात पोहचू लागली.

जानेवारी ते मार्च २०२१ या काळात डहाणूवरून २१ गाडय़ांमधून ११ लाख ७८ हजार चिकू पेटय़ांची वाहतूक करण्यात आली. करोनाच्या काळात काही काळ ही सेवा खंडित राहिल्यानंतर पुन्हा एप्रिलपासून डिसेंबपर्यंत १०२ विशेष किसान रेल गाडय़ांमधून २३ लाख ३८ हजार लाख चिकू पेटय़ांची वाहतूक झाली. यापूर्वी चिकूची वाहतूक करण्यासाठी ट्रकचा वापर केला जात असे व त्या दरम्यान या भागातून आठ ते दहा टन चिकू फळ पोहोचण्यास ३० ते ३२ तास लागत असत. ट्रकमध्ये एकावर एका चिकूच्या अनेक पेटय़ा रचून ठेवल्यामुळे खालच्या पेटय़ांमधील फळे दबली जाऊन तसेच बंदिस्त ट्रकमधील उष्ण वातावरणात चिकूचे खराब आणि पिकण्याचे प्रकार घडत होते.  त्यामुळे थंडीच्या सुमारास अवघ्या १२ ते १८ रुपये प्रति किलो या दराने हे फळ बाहेरगावच्या बाजारांमध्ये   विकले जाई. रेल्वे वाहतूक करताना एकावर एक अशा तीन-चार इतक्याच पेटय़ा तसेच रेल्वे डब्यांच्या एकंदर रचनेमुळे वाहतुकीदरम्यान खेळती हवा पाहता फळ खराब होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. थंडीच्या हंगामात फळे काढल्यानंतर ते खाण्यास योग्य असल्याचा कालावधी सरासरी चार ते सहा दिवसांचा असल्याने लवकरात लवकर व ताज्या स्थितीत बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान किसान रेल्वेने साध्य केले आहे. सध्या डहाणू-घोलवड येथील चिकू १५ ते २२ रुपये प्रति किलो इतक्या दाराने विकला जात आहे.  या नाशिवंत फळाच्या कीपिंग क्वालिटी (फळ सेवन करण्यास योग्य कालावधी) मध्ये काही प्रमाणात वाढ झाली असून त्याचा परिणाम शेतकऱ्यांचे नुकसान कमी झाले आहे, असे   महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे सचिव मिलिंद बाफना यांनी सांगितले.

सेवा पुढेही सुरू ठेवण्याची मागणी

पूर्वी ट्रकद्वारे चिकू वाहतुकीसाठी प्रतिकिलो पाच-सहा रुपये येणारा खर्च सध्या किसान रेल माध्यमातून एक रुपये ८० पैसे प्रति किलोसह ३.५० रुपये प्रति किलो इतका कमी झाल्याने त्याचा लाभ येथील बागायतदारांना होत आहे.  केंद्र सरकारने सुरू केलेली किसान रेल्वेची सवलतीच्या दरात शेतमाल वाहतूक सेवा ही पुढील आर्थिक वर्षांत म्हणजेच २०२२-२३ मध्ये सुरू ठेवावी यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणे आवश्यक आहे. त्यासाठी येथील बागायतदार व्यापारी व नागरिकांनी ई-मेलद्वारे तसेच निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री, अर्थमंत्री तसेच पंतप्रधान यांच्याकडे मागणी केली आहे.

‘सुरक्षित प्रवासाचा विस्तार करावा’

चिकू फळाचा रेल्वेच्या माध्यमातून सुरक्षित प्रवास होत असला तरी फळाच्या लोडिंग-अनलोडिंग खर्चावरील कपात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फळाचे हंगाम नसल्यास २० डब्यांच्या गाडीच्या नियमांमध्ये शिथिलता आणून १५ डब्यांची किसान गाडी सोडण्याची मागणी येथील बागायतदार करीत आहेत. फळाची अवाक कमी असल्यास डहाणू- वलसाड भागातून एकत्र गाडी सोडण्याचे प्रयोजन करण्यात यावे असे बागायतदारांचे म्हणणे आहे. चिकूसह काही डब्यांमध्ये भाजीपाला वाहतूक केल्यास शेतकरी वर्गाला सोयीचे ठरणार असून कृषी विभागाने यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आहे. तसेच दिल्लीसह आग्रा, मथुरा, जयपूर व पंजाबकरिता थेट किसान रेल सेवा सुरू करावी अशी मागणी पुढे येत आहे.