तवा ग्रामपंचायतीमध्ये गदारोळ

डहाणू: आर्थिक दृष्टया दुर्बल तसेच निराधार, विधवा आदिवासी समाजासाठी असलेल्या पंतप्रधान घरकुल योजनेनुसार वंचित कुटुंबाला डावलून पक्की घरे असलेल्या कुटुंबांना घरकुल योजनेत समावेश केल्याने  तवा येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत आक्षेप नोंदवला. ग्रामसभेसाठी आलेल्या तवा, कोल्हाण, धामटणे व पेठ येथील रहिवाशांनी या विरोधात ग्रामसभेतच गोंधळ केला.

 तवा ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत घरकुल योजनेत  २८०0 मंजूर लाभार्थीपैकी अनेक जणांनी चुकीची माहीती देऊन यादीत शिरकाव केला असल्याचे २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेच्या सभेमध्ये समोर आल्यामुळे ग्रामस्थांनी हरकती घेतल्या. घरकुल यादीतील लाभार्थीची पुन्हा तपासणी करण्यासाठी ग्रामसभेचा  ठराव घेऊन तसे पत्र डहाणू गटविकास अधिकारी आणि पालघर जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येईल असे  आश्वासन ग्रामसभेचे अध्यक्ष व माजी तालूकाप्रमुख  संतोष वझे यांनी ग्रामसभेतील उपस्थित ग्रामस्थांना सांगितले. घरकुल योजनेसाठी लाभार्थीना अनेक नियमावलीतील जावे लागते. दुचाकी, चार चाकी गाडी, घरात टिव्ही, फ्रीज तसेच अगोदरच  पक्के घर नाहीत असे लाभार्थीना घरकुल योजनेसाठी निवडले जातात. मात्र काही भागात पंतप्रधान घरकुल योजनेत मोठय़ा प्रमाणात बोगस लाभार्थीची नावे आल्याने आक्षेप घेण्यात येत आहे. त्यामुळे डहाणू तालुक्यात घरकुल योजनेतील बोगस लाभार्थीचा विषय समोर आला आहे.

पालघर जिल्हाधिकारी व डहाणूचे गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन पुन्हा ह्या सर्व लाभार्थीचा सर्वे करून योग्य लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

– संतोष वझे, सामाजिक कार्यकर्ते