तातडीने बैठक घेण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
पालघर : अतिरिक्त दरांच्या आधारे देयक आकारणी केलेल्या करोना रुग्णांना अतिरिक्त रकमेचा परतावा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्रं जिल्हा प्रशासनाने नमूद केलेल्या परतावा रक्कमेबाबत अनेक रुग्णालयांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे संबंधित रुग्णालयांची शल्य चिकित्सक विभागाने तातडीने बैठक घेण्याच्या जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत.
करोनाकाळात अतिरिक्त दराने देयक आकारणी केल्याचे पाहणीत पुढे आले असून सात रुग्णालयांना ५० लाख रुपयांची रक्कम रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना परत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. काही रुग्णालयांना अतिरिक्त दराने आकारणी केल्याचा देयकाचा तपशील उपलब्ध झाला नसल्याचे सांगण्यात आले तर काही रुग्णालयांनी स्वत:च्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना विनामूल्य उपचार केल्यानंतर त्यांची देयके अतिरिक्त देयकांच्या यादित समाविष्ट केल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या लाटेदरम्यान प्राणवायूची कमतरता असताना अतिरिक्त दराने खरेदी केलेल्या प्राणवायू आकारणीचा परतावा कसा देणार असा सवाल रुग्णालय व्यवस्थापन करीत आहे. अतिरिक्त रक्कम ठरवताना जिल्हास्तरीय समितीने रुग्णालय व्यवस्थापनाची बाजू समजून घेतली नसल्याचे काही रुग्णालयांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जिल्हा समितीने जाहीर केले असले तरीदेखील संबंधित रुग्णालय पूर्ण परतावा रक्कम देण्याच्या तयारीत नसल्याची भूमिका मांडत आहेत.
यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्याशी संपर्क साधला असता प्राणवायूची कमतरता असताना वाढीव दराने खरेदी केलेल्या प्राणवायूची त्याच दराने देयकाता नमूद असल्यास त्याला आकारणी अतिरिक्त म्हणून समजू नये असे आपण शल्य चिकित्सक यांना सूचित केले आहे. तसेच संबंधित रुग्णालयांची बैठक घेऊन अतिरिक्त ठरलेल्या देयकांबाबत अंतिम निर्णय घ्यावा व संबंधित रुग्णांना सूचित करण्याची व्यवस्था निश्चित करावी असे त्यांनी लोकसत्तेला सांगितले. दरम्यान जिल्हा प्रशासनाने ५० लाख रुपयांची अतिरिक्त देयकांची रक्कम निश्चित केली असली तरी ही रक्कम संबंधित रुग्णांच्या हाती लागेपर्यंत अवधी लागण्याची शक्यता दिसून येत आहे.
वसईतील रुग्णालयांची कार्यपद्धती अवलंबणार
बोईसर येथील एका खासगी रुग्णालयाने अतिरिक्त देयकांची रक्कम देण्याचे काम सुरू केले असले तरी इतर रुग्णालयांनी कशा पद्धतीने अतिरिक्त देयकांचे वितरण करावे याबाबत शल्य चिकित्सक विभागाने अजूनही सूचना दिल्या नाहीत. वसई -विरार महानगरपालिका क्षेत्रात अतिरिक्त देयके परतावा कशा पद्धतीने दिला जात आहे त्या कार्यपद्धतीचे पालघरमध्ये अवलंब केले जाईल, असे जिल्हा प्रशासनाने विचारणा केली असता ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
