बागायती शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती
वाडा: विक्रमगड तालुक्यातील शिळ-देहेर्जा गावांच्या लगत असलेल्या देहेर्जा नदीवरील सिमेंटच्या बंधाऱ्याला मोठय़ा प्रमाणावर गळती लागली असून वेळीच या गळतीवर उपाययोजना केली नाही तर मार्चअखेर सर्व पाणी निघून जाईल व येथील बागायती शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. विक्रमगड या तालुक्यातून वाहणाऱ्या देहेर्जा नदीवर शिळ-देहेर्जा या दोन गावांच्या दरम्यान गतवर्षी (२०१९-२०) लाखो रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र या बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाल्याने या पहिल्याच वर्षीच त्याला गळती लागली. या बंधाऱ्याचा एक भाग पहिल्याच पावसा वाहून गेला आहे. बंधाऱ्याच्या उर्वरित भागाला एक मोठे भगदाड पडले आहे. या भगदाडामधून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहून चालले आहे.
विक्रमगड तालुक्यातील गावांसाठी तसेच आजूबाजूच्या पाडय़ांमधील शेतकरी तसेच गुरे-ढोरे यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हा बंधारा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या बंधाऱ्याचे सर्व पाणी निघून गेले तर या बंधारा परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली भाजीपाला शेती, किलगड लागवड, फुलशेती, वीट व्यावसायिक मोठय़ा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती शीळ येथील शेतकरी विश्वनाथ जाधव यांनी व्यक्त केली आहे. बंधाऱ्याच्या निकृष्ट कामामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. या बंधाऱ्याची तातडीने गळती थांबवावी अन्यथा संभाव्य होणाऱ्या नुकसानीला प्रशासनाला जबाबदार धरून होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याची तयारी ठेवावी, असा इशारा या परिसरातील शेतकऱ्यानी दिला आहे. दरम्यान, शिळ- देहेर्जा येथील बंधाऱ्याला गळती लागली असल्याची लेखी तक्रार कुठल्या शेतकऱ्यांनी केलेली नाही, असे जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता आर.के.पाटील यांनी सांगितले.
कमी दराच्या ठेक्यामुळे निकृष्ट काम
येथील पावसाचे अधिक प्रमाण लक्षात घेऊन कामाचे अंदाजपत्रक बनविले जात नाही. त्यात ठेकेदारांच्या स्पर्धेत १५ ते २० टक्के कमी दराचा (बिलो) ठेका घेतला जातो. अधिकाऱ्यांना ही टक्केवारी द्यावी लागते. यामुळे बंधाऱ्याची कामे निकृष्ट दर्जाची होतात असे एका ठेकेदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
सर्वच बंधाऱ्यांना गळती
जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग यांनी गेल्या १५ वर्षांत वाडा व विक्रमगड तालुक्यात लाखो रुपये खर्च करून ५० हुन अधिक सिमेंट कॉंक्रिटचे बंधारे बांधले असुन यामधील ९० टक्के बंधाऱ्यातून मोठय़ा प्रमाणावर गळती होत आहे. या बंधाऱ्यातही मार्चअखेपर्यंत पाणी राहात नसल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत.