कोंडवाडा भूमी अभिलेख विभागाने गायब केल्याचे आरोप

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर : १९५७ सालापासून अस्तित्वात असणारा बोईसर पाम गावातील कोंडवाडाच्या जागेचा मालकीबाबत भूमी अभिलेख विभागाने ग्रामपंचायतीच्या विरुद्ध निर्णय दिला असून या निर्णयामुळे ६४ वर्षांपासून उभा असलेला कोंडवाडा वादग्रस्त ठरला आहे. ग्रामपंचायत कार्यालयलगत असणाऱ्या या मोकळय़ा जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबत कारवाई केल्यानंतर संबंधित लगतच्या जागा मालकाने भूमी अभिलेखा विभागाकडून जागेची मोजणी करण्याचे योजिले होते. ग्रामपंचायतीला या मोजणीसंदर्भात कोणतीही पूर्वसूचना प्राप्त न झाल्याने या मोजणीबाबत आक्षेप घेतला होता. या जागेसंदर्भात ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सुनावणी आयोजित करून त्यांची बाजू समजून घेऊ असे सांगण्यात आले होते. मात्र ग्रामपंचायतीला कोंडवाडय़ाची जागा त्यांच्या मालकीची नसल्याचे थेट निकाल पाठविण्यात आला आहे.

यासंदर्भात पामचे सरपंच प्रभाकर संखे यांनी १९५७ पासून अस्तित्वात असलेला कोंडवाडा भूमी अभिलेख विभागाने गायब केल्याचे आरोप केले असून ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणाऱ्या जागेबाबत ग्रामपंचायतीला कोणतीही सुनावणी न देता परस्पर निर्णय घेतल्याबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. यासंदर्भात तालुका भूमी अभिलेख विभागाची संपर्क साधला असता या निकालाबाबत वक्तव्य करण्याचे टाळले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Midst controversy gram panchayat allegations ysh