उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग निदान व उपचार
पालघर: उच्च रक्तदाब, मधुमेह व मुख, स्तन व योनीमुखाचा कर्करोग व इतर असंसर्गजन्य आजारांचे निदान व उपचार अधिक गतिमान करण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने २२ फेब्रुवारी ते ३० मार्च या कालावधीमध्ये ‘मिशन वेलनेस पालघर’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत उपकेंद्र स्तरावर किंवा विशेष शिबिरांचे आयोजन करून ३० वर्षांवरील नागरिक त्यांचे विविध आजारांसाठी परीक्षण करण्यात येणार आहे.
बदलत्या जीवनशैली आणि वाढता ताणतणाव यांच्यामूळे सध्या मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग इत्यादी असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढत आहे. या आजारांचे निदान आणि उपचार योग्य वेळी झाल्यास भविष्यात उद्भवणारे हृदयरोग, थकवा किंवा अकाली मृत्यूसारखे अनेक धोके कमी करणे शक्य आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य जपण्याच्या उद्दिष्टाने आरोग्य विभागानी गेल्या वर्षभरापासून असंसर्गज्य रोगांचे निदान व उपचार यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील सुमारे दीड लाख नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून यातील १८ हजार ७४८ लोकांचे विविध असंसर्गज्य आजारांसाठी निदान होऊन त्यांना उपचाराखाली आणले गेले आहे.
जिल्हयातील नागरिकांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, तसेच आपल्या भागातील शिबिरांची माहिती घेण्यासाठी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा उपकेंद्र येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी व डॉ. तनवीर शेख (नोडल अधिकारी-असंसर्गजन्य रोग) यांनी केले आहे.
३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी
मिशन वेलनेस पालघरअंतर्गत आरोग्य विभागाच्या सर्व संस्थांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह व मुखाच्या कर्करोगासाठी व महिलांच्या अनुमतीने स्तनाचा व योनीमुखाच्या कर्करोग या आजांरासाठी निदान व उपचार शिबिरांचे युद्धपातळीवर आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ३० वर्षांवरील वयोगटातील सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.