डहाणू: डहाणू तालुक्यातील आदिवासी जनतेच्या विविध समस्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मंगळवारी श्रमजीवी संघटनेने डहाणू प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयात देण्यात आले. या आंदोलनादरम्यान डहाणू आणि तलासरीतील ३९२ कुटुंबांना रेशनकार्डाचे वाटप करण्यात आले. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील दुर्गम आणि गरीब कुटुंबांना जातीचे दाखले, वनपट्टे, रेशन कार्ड, घरकुल योजना आदी योजना आणि शासनाच्या उपक्रमांचे लाभ वेळेवर मिळत नाहीत. अत्यावश्यक कागदपत्रांसाठी सतत चकरा माराव्या लागतात. तरीही त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे मंगळवारी श्रमजीवी संघटनेने अशा कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ रेंजड, सरचिटणीस गणेश उंबरसडा, उपाध्यक्ष नरेश वरठा, रामा रोज, रेखाताई धांगडा, डहाणू अध्यक्ष हरिश्चंद्र उंबरकर, तलासरी अध्यक्ष अनिल भाऊ करबट, सुनीता मार्कुस, असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.