पालघर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान असले तरी त्या भूमिकेत राहण्याऐवजी धर्म-जातीच्या आधारे समाजाचे ध्रुवीकरण करून ते भाजपचे प्रचारक म्हणून काम करत आहेत, अशी टीका अर्थतज्ज्ञ व माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मोदी सरकारवर केली आहे.
पालघर येथील दोन दिवसीय दौऱ्यादारम्यान आयोजित आताची भारतीय अर्थव्यवस्था व परिणाम या छोटेखानी चर्चासत्रात ते बोलत होते. मोदी सरकारने वीस लाख कोटी चे धोरण जाहीर केले असले तरी त्यांनी दिलेला आकडा भरवशाचा नाही या धोरणामध्ये एक लाख ७० हजार कोटी इकॉनोमी पॅकेज होते बाकीचे सर्व कर्ज होते, अशी माहिती त्यांनी दिली. वस्तू व सेवा करप्रणाली स्वत:च्या हातात ठेवून राज्यांसोबत दुजाभाव केल्याचा आरोप त्यांनी केला.
पेट्रोल व इंधने जीएसटीच्या कक्षेमध्ये आणावी अशी मागणी केली होती मात्र अजूनही ती त्या कक्षेत आणली गेली नाहीत कारण त्या करावर मिळणारे उत्पन्न राज्याला द्यावे लागेल यासाठी मोदी सरकार तसे करत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.वस्तू व सेवा कर आकारणी करताना काँग्रेसने एक राष्ट्र एक कर पद्धत नियोजन केले होते. हीच पद्धत मोदी सरकारने अवलंबली असली तरी कराची विभागणी करून ते अनेक प्रकारात विभागले त्यामुळे वस्तू व सेवा कराच्या मूळ उद्देशालाच हरताळ फसल्याचे त्यांनी सांगितले.
अलीकडच्या काळात भारतामध्ये मुस्लिमांवर होत असलेले अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे आखाती देशांनी ही पाश्र्वभूमी लक्षात घेता तेल उत्पादन व भारताला त्याची निर्यात कमी केली आहे, असे मुणगेकर यांनी सांगितले.भारतात शेअर बाजार हा एक जुगार बनला आहे. मोठ मोठे धनाढय़ व्यवसायिक या बाजारांमध्ये कृत्रिम चढ-उतार आणतात. या बाजारामध्ये सर्वाधिक मध्यमवर्ग सामील आहे.त्यामुळे या चढ -उतारात मध्यमवर्ग पूर्णपणे भरडून गेला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
अमेरिकेने व्याजदर वाढल्याने भारतात गुंतवलेले परकीय चलन काढून घेण्यात आले. त्याचा परिणाम रुपयावर झाला. अलीकडे रुपयांच्या आंतरराष्ट्रीय किमतीत झालेली घसरण ही गेल्या वीस वर्षांतील सर्वात मोठी घसरण आहे असे मुणगेकर यांनी प्रकर्षांने सांगितले.भारतीय अर्थव्यवस्था व त्यामध्ये सबलीकरण आणण्यासाठी या व्यवस्थेत काम करत असलेले अर्थशास्त्रज्ञ यांनी व्यवस्थेतून काढते पाय घेतले आहेत. सरकारचे गुलाम होऊ नये यासाठी ते या व्यवस्थेतून बाहेर पडत आहेत, ही खेदजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या ३४ वर्षां मध्ये भारतामध्ये भाजपला केंद्रात सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्याच्या जोरावर त्यांनी सरकार स्थापन केले असले तरी धोरणात्मक निर्णय अजूनही घेण्यात आलेले नाहीत. या सरकारला चांगली सेवा करण्याची संधी भारतवासीयांनी प्राप्त करून दिली आहे. शांततेच्या मार्गाने मोदी सरकारने पुढे जाऊन धोरणात्मक निर्णय घ्यावेत व सुशासन चालवावे अशी इच्छा मुणगेकर यांनी प्रकट केली.