पालघर : राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागात आतापर्यंत बीएस६ प्रणालीच्या ३० नवीन बस दाखल झाल्या असून या गाड्या लांब पल्ल्यासाठी वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे कालबाह्य झालेल्या बसची जागा नवीन गाड्यांनी भरून काढली आहे. जुन्या गाड्यांप्रमाणे नवीन गाड्या या वारंवार खराब होणार नसल्याने लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाच्या आठही आगारांकरिता प्रत्येकी १० नवीन बसची मागणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पालघर व जव्हार आगारात आतापर्यंत टप्प्याटप्प्याने प्रत्येकी १० नवीन बस तर बोईसर व वसई आगारात प्रत्येकी पाच बस दाखल झालेल्या आहेत. पालघर विभागातल्या १५ वर्षापासून कार्यरत असलेल्या २९ बस एप्रिल महिन्यात कालबाह्य झाल्या असून नवीन दाखल झालेल्या ३० बसमुळे जुन्या बसची जागा भरून निघाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर विभागाला नवीन बस गाड्यांची आवश्यकता असल्याने पालघर विभागातील पालघर, सफाळे, डहाणू, नालासोपारा, अर्नाळा, जव्हार, बोईसर, वसई या आठही आगारांना नवीन १० गाड्या लवकरात लवकर देणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मागील महिन्यात पालघर दौऱ्यादरम्यान जाहीर केले होते.पालघर आगारामध्ये दाखल झालेल्या १० गाड्या या लांब पल्ल्यासाठी वापरण्यात येत असून यामध्ये दोन स्वारगेट, दोन पैठण व तीन भुसावळ उर्वरित संभाजीनगर, अमळनेर, नंदुरबार करिता वापरल्या जात आहेत. अनेक वेळा जुन्या गाड्या प्रवासादरम्यान ब्रेक डाऊन व खराब होण्याच्या घटना वारंवार घटत होत्या. मात्र आता या नवीन गाड्यांमुळे त्याला काही अंशी ब्रेक मिळणार असून नवीन गाड्या सुस्थितीत चालतील अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पालघर विभागात एकूण ४१० बस कार्यरत असून प्रत्येक आगाराला पहिल्या टप्प्यात १० बसेस प्रत्येकी देणार असल्याने पालघर व जव्हार आगाराच्या १० बसेसचा कोटा पूर्ण झाला असून पालघर विभागाकरिता अजून ४० बसची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.

गावी जाणाऱ्या प्रवाशांना सुखकर प्रवासाची शाश्वती

नवीन बस गाड्या या लांब पडण्यासाठी धावणार असल्याने आतापर्यंत दाखल झालेल्या 30 गाड्यांमधून जवळपास १२०० हुन अधिक प्रवासी लांब पल्याचा प्रवास करीत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात व आता शाळा संपल्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना नवीन बसमुळे सुखकर प्रवासाची शाश्वती मिळाली आहे.

एसटीची दैनंदिन देखभाल

नव्या व जुन्या गाड्यांची दैनिक, दशदिनी व त्रैमासिक देखभाल करण्यात येते. यामध्ये तेल, हवा, पाटा, हँगर होल्ड, ग्रीसिंग, डॉकिंग, लाईट यासह इतर बाबी तपासून दुरुस्त केल्या जातात. यामुळे स्थानिक गाड्यांसह लांब पल्यांच्या गाड्यांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत नाही.

पालघर विभागातील काही गाड्या नुकत्याच कालबाह्य झाल्या आहेत. तसेच एकूण 120 गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. नवीन गाड्यांमुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून गाड्यांची देखभाल दुरुस्ती देखील नियमित सुरू आहे.कैलास पाटील, विभाग नियंत्रक

बोईसर आगारात नुकत्याच पाच नवीन बस गाड्यांचे उद्घाटन पार पडले. नवीन दाखल झालेल्या पाच बस या ज्योतिबा व भुसावळ करिता प्रत्येकी दोन व नंदुरबार करिता एक बस धावणार आहे. नवीन गाड्यांनी प्रवास करण्याकरिता प्रवासी उत्सुक आहेत. इजाज शेख, बोईसर आगार प्रमुख

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar division added 30 bs6 buses replacing old ones for long distance travel sud 02