पालघर : पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये काम करीत असलेल्या अर्धवेळ परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा आरोग्य कार्यालयासमोर आंदोलन केले. तुटपुंजे मानधन वाढवून मिळावे ही मागणी आंदोलनाच्या केंद्रस्थानी होती.
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी अर्धवेळ परिचारिका काम करीत आहेत. त्यांना मिळणारे मानधन कमी आहे. त्यामुळे त्या आर्थिक अडचणीत आहेत. हे मानधन वाढवून द्यावे अशी मागणी याआधीही जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाने दिली होती व संपाचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही या मागणीचा विचार न केल्याने हे आंदोलन छेडले गेले असे आंदोलनकर्त्यां परिचारिकांनी म्हटले आहे. राज्यभर केलेल्या आंदोलनात पालघर जिल्ह्यातील परिचारिकांनी सहभाग दर्शवत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेत पालघरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी स्थानिक स्तरावरील मागण्या आम्ही पूर्ण करू असे सांगत ज्या बाबी व मागण्या धोरणात्मक आहेत. त्यासाठी आंदोलकांच्या मागण्या शासनदरबारी पोचवू असे लेखी आश्वासन दिले.
या आहेत मागण्या
किमान १८ हजार रुपये वेतन देण्यात यावे, नियमित सेवेत कायम करावे, कोविड भत्ता व विमा कवच देण्यात यावे. दरवर्षी गणवेश व भाऊबीज रक्कम देण्यात यावी. रिक्त पदांवर अशंकालीन महिला परिचारिकांच्या कुटुंबातील व्यक्तीला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. अशंकालीन व अर्धवेळ या नावात बदल करावे. पेन्शन योजना लागू करावी, कार्यक्षेत्रात फिरते प्रवास भाडे द्यावे.
तीन हजारांत उदरनिर्वाह करणे अवघड
२० रुपयांपासून अंशकालीन परिचारिकांनी काम सुरू केले आहे. आजघडीला त्यांना ३००० हजार रुपये महिना मानधन मिळत आहे. यामध्ये २९०० रुपये राज्य शासन देते. तर १०० रुपये केंद्र शासन देते. या मानधनात उदरनिर्वाह करणे अवघड आहे. त्यामुळे ते वाढवून १८ हजार करावे अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून मागितली गेली.