नववी-दहावीच्या शिक्षकांच्या पुनर्नियुक्त्याच नाहीत
पालघर : पालघर जिल्ह्यत आठवी ते दहावीला शिक्षण देणाऱ्या इंग्रजी, गणित, विज्ञान विषयाच्या कंत्राटी शिक्षकांना पुनर्नियुक्तीचे आदेश न दिल्यामुळे या कंत्राटी शिक्षकांवर बेकारीची टांगती तलवार उभी आहे. विद्यार्थ्यांंचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर नियुक्त्या द्याव्यात अशी मागणी या शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे केली आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नववी व दहावीचे वर्ग संलग्न केल्यानंतर कायमस्वरूपी शिक्षक भरती शक्य नसल्याने इंग्रजी, गणित, विज्ञान विषयासाठी शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर घेण्यात आले होते. दरवर्षी त्यांना पुनर्नियुक्ती देण्यात येत होत्या. मात्र दीड वर्षांत करोना काळ आल्यामुळे अचानक शाळा बंद ठेवाव्या लागल्या. त्यानंतर या सर्व शिक्षकांची सेवा खंडित झाली, तर काहींचा कंत्राट कालावधी संपुष्टात आला. त्यानंतर अजूनही या शिक्षकांना पुनर्नियुक्ती देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांची बेकारी सदृश्य स्थिती निर्माण झाली.
शिक्षक तात्पुरत्या स्वरूपातील कंत्राटी शिक्षक असले तरी विद्यार्थ्यांंच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न लक्षात घेत कंत्राट कालावधी संपल्यानंतरही त्यांनी ऑफलाइन व ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचे सुरू ठेवलेले आहे. अलीकडेच दहावीच्या निकालाच्या कामांचे कोणतेही आदेश नसतानाही या शिक्षकांनी त्या संदर्भातील कामे केलेली आहे. सद्यस्थितीत आदेश दिलेले नसल्यामुळे सुरु झालेल्या शाळेत अध्यापनासाठी जाण्याबाबत या शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने पुनर्नियुक्ती यांचे आदेश द्यावेत अशी मागणी या शिक्षकांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नववी व दहावी चे वर्ग संलग्न असलेली पालघर जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील पहिलीच जिल्हा परिषद आहे जिल्ह्यत साठहून अधिक शाळांमध्ये नवीन दहावीचे वर्ग सुरू आहेत या वर्गांवर विद्यार्थ्यांंच्या शिक्षणासाठी कंत्राटी तत्वावर तसेच मानधन तत्वावर शिक्षकांची नेमणूक केली आहे.
शिक्षकांच्या पुनर्नियुक्ती संदर्भात निर्णय झाला असून लवकरच शिक्षण विभाग विद्यार्थ्यांंच्या हिताच्या दृष्टीने आदेश देऊन या शिक्षकांना शाळेत पूर्वीप्रमाणे सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.लवकरच शिक्षकांना लेखी आदेश दिले जातील.
ज्ञानेश्वर सांबरे, उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण विभाग, जि. प. पालघर