पालघर : तलासरी तालुक्यातील झाई गावातील ग्रामस्थांना भेडसावत असणाऱ्या समस्यांची पाहणी केल्यानंतर या गावातील पायाभूत सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन समिती निधीमधून ५० लाख रुपये किमतीची कामे मंजूर केली आहेत. तसेच तलासरी ग्रामीण रुग्णालयात द्रव्यरूपी प्राणवायू टाकी बसवण्यासाठी मंजुरी दिली आहे. जिल्हाधिकारी यांनी ५ जानेवारी रोजी मासेमारी व पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या झाई गावाला भेट दिली. या गावात मांगेला समाजाची वस्ती असून तलासरी तालुक्यात प्रस्तावित व प्रलंबित कामांचा आढावा या वेळी घेण्यात आला. याप्रसंगी झाई मच्छीमार सोसायटीचे राजेंद्र मजवेलकर व ग्रामस्थांनी गावातील समस्या तसेच गैरसोयी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी झाई ग्रामस्थांच्या मागणीनुसार नियोजन समितीच्या निधीमधून ५० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून त्यामध्ये झाई येथील मुख्य बाजारपेठेतील रस्ता, अंतर्गत सुनियोजित गटार व्यवस्था तसेच समुद्रकिनारी पर्यटकांना जाण्यासाठी रस्ते, पदपथ, सौरदिवे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना सूचना दिल्या. या दौऱ्यावर जिल्हाधिकारी यांच्यासमवेत तहसीलदार श्रीधर गलिपेल्ली, गटविकास अधिकारी राहुल म्हात्रे तसेच सा.बां.विभागाचे तलासरी उपविभागीय अभियंता महेंद्र किणी आदी उपस्थित होते. तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयाला जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन त्या ठिकाणी द्रव्य रूपातील प्राणवायू टाकी उभारण्यासाठी मंजुरी दिली. रुग्णालयातील इतर सोयीसुविधांचा आढावा घेऊन लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका प्रशासनाला निर्देश दिले.