कचराभूमीतून निचरा होणारे पाणी नदीपात्रात

वाडा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा नदीतील जलाशयाला लागूनच एका खासगी जागेवर वाडा नगरपंचायतीने गेल्या तीन वर्षांपासून कचराभूमी तयार केली आहे. या कचराभूमीतून निचरा होणारे घाण पाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात जमा होत असल्याने वाडा शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

४० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या वाडा शहरातून रोज दहा ते बारा टन सुका व ओला कचरा वैतरणा नदीकिनारी (सिदेश्वरी) येथील कचराभूमीत टाकला जात आहे. वाडा शहरात असलेली मोकाट कुत्री, जनावरे, डुकरे ही मरण पावल्यानंतर यांचे मृतदेहसुद्धा याच कचराभूमीत आणून टाकले जातात. गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.  पावसामुळे या कचराभूमीतील कचरा कुजून उग्र वास येत आहे. कचराभूमीतील दरुगधीत झालेल्या दूषित पाण्याचा निचरा अवघ्या १० ते १२ मीटर अंतरावर असलेल्या वैतरणा नदीच्या पात्रात वाहून जात आहे.

नदीपात्रातील याच जलाशयातून वाडा शहरासाठी पाणीपुरवठा केला जात आहे. प्रतिदिन २० लाख लिटर पाणी मोटार पंपाच्या साहाय्याने या जलाशयातून उचलून ते वाडा शहरासाठी वितरित केले जाते. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून वाडा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीतील जलशुद्धीकरण यंत्रणा बंद आहे. यामुळे या अशुद्ध पाण्यापासून नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे.

या कचराभूमीच्या प्रदूषणाने वाडा नगरवासी आधीच हैराण झालेले असतानाच आता प्रदूषित पाणी प्यावे लागत असल्याने येथील नागरिकांच्या विविध आजारांतही वाढ झालेली दिसून येत आहे. ही कचराभूमी इतरत्र हलविण्याच्या मागणीसाठी येथील गांवदेवी मित्र मंडळाच्या सदस्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून नगरपंचायत प्रशासनाकडे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र त्याची प्रशासन अथवा पदाधिकारी यांच्याकडून दखल घेतली गेलेली नाही.

तुसे, ऐनशेत, गांध्रे गावांनाही धोका

नदीपात्रातील पाणी सध्या वाहात नसल्याने या साचलेल्या जलाशयात कचराभूमीतील निचरा होणारे पाणी जाऊन जलाशयातील पाणी प्रदूषित होत आहे. नदीपात्रातील पाणी वाहू लागल्यानंतर या नदीच्या पाण्यावर पुढे तुसे, ऐनशेत, गांध्रे या ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजना सुरू आहेत. या गावांनाही या प्रदूषित पाण्याचा धोका संभवतो. नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक असलेली ही कचराभूमी तातडीने अन्य ठिकाणी हलविण्यात यावी.

– राजेंद्र समेल, ग्रामस्थ व सदस्य गांवदेवी मित्र मंडळ, वाडा.

नगरपंचायतीने कचराभूमीसाठी अन्य ठिकाणी जागा खरेदी केली आहे. काही दिवसांतच त्या जागेत कचराभूमी सुरू होईल.

राम जाधव, सभापती, आरोग्य व स्वच्छता समिती, नगरपंचायत वाडा

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water pollution yard drainage water landfill river basin ssh