अवघ्या वीस-बाविसाव्या वर्षी पहिला सिनेमा करणारी आलिया भट्ट. आज तिचं नाव मोजक्याच पण कसदार भूमिका करणाऱ्या दर्जेदार अभिनेत्रींच्या बरोबरीने घेतलं जातं. वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी आलिया भट्ट बॉलीवूडची सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री ठरली. तिने केलेला प्रत्येक सिनेमा यशस्वी ठरला एवढंच नाही तर त्यातल्या तिच्या अभिनयाचं भरपूर कौतुक झालं. देशातील बहुतेक मोठे ब्रॅण्ड्स तिला आपल्या उत्पादनासाठी ब्रॅण्ड अम्बॅसॅडर म्हणून करारबद्ध करण्यासाठी एका पायावर ‘राजी’ आहेत. बॉलीवूडमध्ये कुणाही अभिनेत्रीला हेवा वाटावा अशी तिची वाटचाल सुरू आहे. तिचा प्रत्येक परफॉर्मन्स आजच्या तरुणाईला भावतोय. आलिया अभ्यासात यथातथाच होते. जमनाबाई नरसी शाळेत असताना, अभ्यासात फारशी प्रगती नसली तरी ती तिच्या शिक्षकांची लाडकी होती. कारण ती लहानपणी एकदम अॅक्टिव्ह होती. स्नेहसंमेलनातून भाग घ्यायला तिला फार आवडायचं. तिने सातवीत असताना वडिलांना म्हटलं होतं, ‘मला यापुढे अभ्यास करायचा नाहीये. मेरे लिये कोई फिल्म बना डालो.’ वडील महेश भट्ट चमकले! ‘फिल्म में काम करोगी आलू? (आलियाचे घरगुती टोपण नाव) क्यों? अॅक्टिंग अच्छी लगती है तुम्हे?’ यावर ती त्यांना म्हणाली, ‘अॅक्टिंग का तो पता नहीं, लेकिन गोविंदा-करिश्मा जैसे डान्स करना है मुझे। कहीं भी! एअरपोर्टपर, गार्डन में, रोडपर! शाळेत फक्त वार्षिक स्नेहसंमेलनातून डान्स करायला मिळतो!’ वडिलांनी बॉलिवूडमध्ये आलियाला लाँच केलं नाही म्हणून ती नाराज झाली खरी, पण तिच्यातील फिल्मी किडा पाहून करण जोहरने त्याच्या ‘स्टुडण्ट ऑफ द ईअर’मध्ये आलियाला लाँच केलं. त्या वेळेस ती १७ वर्षांची होती. ‘स्टुडण्ट ऑफ द ईअर’ला घवघवीत यश मिळालं आणि आलियाला तिचा मेटाँर मिळाला. ती करणला तिच्या लहानपणापासूनच ‘मेंटॉर’ मानत आलीय. करणच्याच सांगण्यामुळे इम्तियाझ अलीने आलियाला तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच ‘हायवे’सारखा अर्थपूर्ण चित्रपट दिला. अवघ्या सात वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत आलियाने भल्याभल्यांना मागे टाकलंय. वडिलांनी लाँच केलं नाही म्हणून आलिया त्यांच्यावर रागावली होती. पण तिच्या यशाचा चढता आलेख ही महेश भट्ट यांच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. ‘हायवे’ सिनेमासाठी आलियाला अनेक पारितोषिके मिळाल्यानंतर महेश भट्ट यांनी प्रेमाने, अभिमानाने तिचा ऑटोग्राफ घेतला आणि त्याचं लॅमिनेशन करून त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवलं.
अवघ्या सात वर्षांत भल्याभल्यांना मागे टाकणारी आलिया; वडिलांनीही घेतला ऑटोग्राफ
Web Title: Alia bhatt birthday special and unknown things about the actress ssv