'खुलता कळी खुळेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे याने २९ जुलै रोजी आत्महत्या केली. आशुतोषने नांदेडमधल्या राहत्या घरी गळफास लावून स्वत:चं आयुष्य संपवलं. तो ३२ वर्षांचा होता. आशुतोष अभिनेता होता पण फार कमी लोकांना हे माहित असेल की तो चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी एका आयटी कंपनीचा संचालक होता. नांदेडमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात आशुतोषचा जन्म झाला. त्याचं संपूर्ण बालपण आणि शालेय शिक्षणसुद्धा नांदेडमध्ये झालं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नांदेडहून पुण्याला आला. पुण्यातील एका प्रतिष्ठित संस्थेत त्याने अॅडमिशन घेतलं आणि तिथून त्याने बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्सची पदवी घेतली. त्यानंतर एमबीएचं शिक्षण घेण्यासाठी तो पुन्हा नांदेडला गेला. नांदेड युनिव्हर्सिटीतून त्याने कम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये एमबीए पूर्ण केलं. नांदेडमध्ये एमबीए पूर्ण झाल्यानंतर आशुतोष नोकरीच्या शोधात मुंबईला आला. मुंबईतील एका नामांकित आयटी कंपनीत त्याने सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून तीन वर्षे काम केलं. मेहनत आणि चिकाटी यांमुळे आशुतोष याच कंपनीचा संचालकदेखील झाला होता. डॉक्टरांना कागदविरहित काम करता यावं यासाठी त्याला एका सॉफ्टवेअर तयार करायचं होतं. मात्र अभिनयाची आवड असल्यामुळे त्याने ती मोठ्या पगाराची नोकरी सोडली आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. काही वर्षांच्या संघर्षानंतर आशुतोषला चांगले प्रोजक्ट मिळू लागले आणि तो प्रकाशझोतात आला होता. २०१२ मध्ये त्याने 'इचार ठरला पक्का' या चित्रपटात काम केलं आणि २०१४ मध्ये त्याने 'भाकर' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. अभिनेत्री मयुरी देशमुख व आशुतोष यांचं अरेंज मॅरेज होतं. एका कौटुंबिक कार्यक्रमात दोघंजण पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर मयुरीच्या आईवडिलांनी आशुतोषबद्दल तिचं मत विचारलं आणि त्याला पुन्हा एकदा भेटण्याचा सल्ला दिला. मयुरी त्यावेळी लग्नासाठी तयार नव्हती पण आईवडिलांच्या खातर ती आशुतोषला पुन्हा एकदा भेटण्यासाठी तयार झाली. मयुरीसोबत काही वेळ घालवल्यानंतर आशुतोषने तिला लग्नासाठी विचारलं आणि मयुरीनेही नंतर होकार दिला. आठ महिने एकमेकांना डेट केल्यानंतर २१ जानेवारी २०१६ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून मयुरी घराघरात पोहोचली. आशुतोषने मयुरीला तिच्या करिअरमध्ये खूप साथ दिली. लग्नानंतरही त्याने मयुरीला अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी पाठिंबा दिला. गेल्या काही महिन्यांपासून आशुतोष नैराश्यात होता आणि त्यावर उपचारसुद्धा सुरू होते. आशुतोषने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य – इन्स्टाग्राम, आशुतोष भाकरे)
IT कंपनीचा डायरेक्टर ते अभिनेता…असा होता अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीचा प्रवास
Web Title: From being an it professional to making it big in marathi industry a look at aashutosh bhakre journey ssv