'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील 'बबड्या' हे पात्र आता अनेकांच्याच परिचयाचं झालं आहे. बबड्या हे नाव ऐकलं तरी अनेकांना चीड येते. मालिकेत 'बबड्या' म्हणजेच सोहमची भूमिका अभिनेता आशुतोष पत्की साकारत आहे. मालिकेत सोहम या पात्राला 'बबड्या' हे टोपणनाव कसं देण्यात आलं, यामागची खरी गंमत अभिनेत्री तेजश्री प्रधानने सांगितली. मालिकेत आसावरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना करोना झाल्याने मालिकेत काही बदल करण्यात आले. आता सेटवरच्या गमतीजमती तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की आणि गिरीश ओक हे तिघे मिळून सांगत आहेत. याच विशेष भागात तेजश्रीने 'बबड्या' या नावामागची खरी गंमत सांगितली. खरंतर स्क्रिप्टमध्ये कुठेच बबड्या या नावाचा उल्लेख नव्हता, असं तिने सांगितलं. "शूटिंगच्या पहिल्या दिवशी निवेदता सराफ यांच्या तोंडून सोहमसाठी 'बबड्या' हे नाव संवादांच्या ओघातच निघून गेलं. नंतर दिग्दर्शकांनाही ते आवडलं. म्हणून पुढे बबड्या हेच नाव सोहमला देण्यात आलं", असं तेजश्रीने सांगितलं. "बबड्या हे नाव ऐकलं तरी अनेकांना चीड येते. पण माझ्यासाठी निवेदिता यांनी दिलेलं ते नाव खूप महत्त्वाचं आहे. त्यात एका आईची माया, प्रेम आहे", असं यावेळी आशुतोष म्हणाला. 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान, गिरीश ओक आणि आशुतोष पत्की यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. आता सोशल मीडियावरही 'बबड्या' चांगलाच प्रसिद्ध असून त्यावरून अनेक मीम्सदेखील व्हायरल होतात. (सर्व छायाचित्र सौजन्य- आशुतोष पत्की, इन्स्टाग्राम)
‘बबड्या’ हे नाव कसं सुचलं? तेजश्रीने सांगितली खरी गंमत
Web Title: Aggabai sasubai fame actress tejashree pradhan telling a story behind the name of babadya ssv