-
पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिचा मित्र शुभम देगडे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. सोमवारी, २० सप्टेंबर रोजी गोव्यातील बागा-कलंगुट येथे गाडी खाडीत कोसळून ईश्वरी आणि शुभमचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास बागा येथील अरुंद रस्त्यावरुन जात असताना शुभमचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी खाडीत जाऊन कोसळली. दरम्यान गाडी लॉक झाल्यामुळे दोघेही गाडीत अडकले. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
-
२०१२ साली मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा मृत्यू झाला. वयाच्या ४८ व्या वर्षी आनंद अभ्यंकर यांनी जगाचा निरोप घेतला. आनंद अभ्यंकर हे मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कलाकार होते. ‘या गोजीरवाण्या घरात’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. वास्तव, जिस देश में गंगा रहता है, मातीच्या चुली, स्पंदन या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.
-
२०१२ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आनंद अभ्यंकर यांच्यासोबतच्या अपघातात अभिनेता अक्षय पेंडसेचा देखील मृत्यू झाला. निधनावेळी अक्षयचे वय फक्त ३३ वर्षे इतके होते. उर्से टोलनाक्याजवळ बऊर गावाजवळ अभ्यंकर यांच्या मारुती व्हॅगनार गाडीला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात अभिनेते अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रत्युषचाही मृत्यू झाला. एका कार्यक्रमाचे चित्रीकरण संपवून अक्षय पेंडसे आनंद अभ्यंकर यांच्यासोबत पुण्याहून मुंबईकडे निघाला होता. अक्षय पेंडसेने प्रायोगिक रंगभूमीवर अनेक नाटकांमध्ये काम केले होते. माझ्या वाटणीचे खरेखुरे, सिगारेट्स ही प्रायोगिक नाटके, ‘मिस्टर नामदेव म्हणे’ हे व्यावसायिक नाटक आणि ‘उत्तरायण’ चित्रपटातील त्याच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या होत्या.
-
हिंदी-मराठी सिनेमांत आणि मराठी-गुजराती नाटकांत काम करणा-या प्रसिद्ध अभिनेत्री भक्ती बर्वे इनामदार यांचे मोटार अपघातात वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. १२ फेब्रुवारी २००१ रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती.
-
एक गाव बारा भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटवलेले अभिनेते अरुण सरनाईक यांचे १९८४ मध्ये पुण्याहून कोल्हापूरला जाताना टॅक्सीच्या अपघातात निधन झाले होते. त्यावेळी अरुण सरनाईक ४९ वर्षांचे होते.
-
प्रसिद्ध मराठी गायिका गीता माळी यांचे शहापूरजवळ अपघाती निधन झाले. मूळच्या नाशिकच्या असणाऱ्या गीता या मागील काही महिन्यांपासून अमेरिकेमध्ये होत्या. भारतात परतल्यानंतर नाशिकला जाताना मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्या ३७ वर्षांच्या होत्या. गीता माळी यांनी सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या सुरेल आवाजाने वेगळी ओळख निर्माण केली होती.
‘ईश्वरी देशपांडे’ ते ‘आनंद अभ्यंकर’; ‘या’ मराठी कलाकारांनी कार अपघातात घेतला अखेरचा श्वास
Web Title: Marathi actors ishwari deshpande to anand abhyankar stars who died in car road accidents information photos sdn