-
गणराय घरी आले की पारंपरिक चमचमीत पदार्थाची रेलचेल घरोघरी चाखायला मिळते. गणेशोत्सव काळात बनवल्या जाणाऱ्या ‘मोदकाची चव’ आईच्या हातची वेगळी, आजीच्या हातची वेगळी तर ताईच्या हातची फ्यूजन असते. आजच्या तरुणाईला राहणीमानात, वावरण्यात, खाण्यापिण्यात जसा हटके तडका हवा असतो. तसाच तो त्यांना गणपतीच्या नैवेद्याच्या पानात देखील हवाय. असंच काहीसं चित्र सध्या तरुणवर्गात पाहायला मिळतंय. तरुण खवय्यांना पहिल्या दिवशी पारंपरिक मोदक तर हवेच दुसऱ्या दिवशी वाटीभर ऋषीची भाजीदेखील चाखायला हवी. परंतु तिसऱ्या दिवशी काही तरी ‘हटके’ पदार्थ पानात हवा. जाणून घ्या असेच हटके मधुर पदार्थ गणपतीच्या नैवेद्याच्या पानाची शोभा वाढवण्यासाठी व घरी दर्शनाला आलेल्या मित्रांच्या जिभेवरची लज्जत वाढवण्यासाठी…
-
पनीरची खीर साहित्य : पनीर पाव किलो, दूध २ लिटर, कॉर्नफ्लोअर १ चमचा, केवडा इसेन्स पाव चमचा, साखर १ वाटी, कदाम-पिस्ते ४ चमचे. कृती : पाव किलो ताजे पनीर घेऊन त्याचे छोटे छाटे चौकोनी तुकडे करावेत. दोन लिटर दूध आटवायला ठेवा. त्यात १ चमचा कॉर्नफ्लोअर घालून निम्मे होईस्तोवर आटवावे, नंतर साखर घालून एक उकळी येऊ द्या. साखर विरघळली की खाली उतरवून थंड करावे. नंतर त्यात पनीरचे तुकडे, केवडा इसेन्स घालून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवावे. सव्र्ह करतेवेळी वरून बदाम पिस्ता घालून सव्र्ह करावे.
-
ब्रेड स्टफ गुलाबजाम साहित्य : खवा २०० ग्रॅम, सुका मेवा अर्धी वाटी, पीठी साखर २ चमचे, ब्रेड स्लाइस ४-५, दूध अर्धी वाटी, तूप पाव वाटी, चांदी वर्ख सजावटीकरिता, बदाम-पिस्ते २ चमचे. कृती : २०० ग्रॅम खवा घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी सुका मेवा, २ चमचे पिठी साखर घालून एकत्र करा हा झाला खव्याचा मसाला. मोठय़ा ब्रेडच्या ४ ते ५ स्लाइस घेऊन त्याच्या कडा कापून घ्या. नंतर हे ब्रेड दूधात भिजवून पिळून घ्या व यात खव्याचा तयार मसाला घालून हाताने मुठीया बांधून मंद आचेवर साजूक तुपावर तळून घट्ट साखरेच्या पाकात घालून लगेच काढा, त्यावर चांदी वर्ख व बदाम पिस्त्याचे काप घालून सव्र्ह करा.
-
बटाटय़ाची जिलेबी साहित्य – बटाटे पाव किलो, मदा ५० ग्रॅम, साखर २ वाटय़ा, लिंबाचा रस अर्धा चमचा, केशर पाव चमचा. कृती – पाव किलो बटाटे उकडून सोलून किसून घ्या. नंतर त्यात ५० ग्रॅम मदा मिसळा. थोडे पाणी घालून भज्याच्या पिठापेक्षा थोडे घट्ट पीठ भिजवा. एका दुसऱ्या भांडय़ात एकतारी साखरेचा पाक बनवून ठेवा. पाकात थोडा लिंबाचा रस व केशर घाला. फ्रायपॅनमध्ये तूप घालून गरम झाल्यावर त्यात बटाटय़ाच्या पिठाच्या नेहमीप्रमाणे जिलब्या काढून घ्या. नंतर लगेच पाकात घालून अर्धा मिनिटे ठेवून बाहेर काढा व सव्र्ह करा.
-
श्रीखंड-खजूर लाडू साहित्य – १ वाटी दही, १ वाटी दूध, १ वाटी साखर, १ वाटी किसलेले काजू-बदाम, तुपात भाजलेले खजूर, चारोळी, केशर, जायफळ-वेलची पावडर कृती – प्रथम गॅस पेटवून कढईत दही, दूध, साखर एकत्र टाकून हलवावे. या मिश्रणाचा घट्ट गोळा होईपर्यंत हलवावे. नंतर त्यात काजू-बदाम पावडर, चारोळी, दुधात भिजवलेले केशर टाकून हलवावे. हे मिश्रण कढईपासून सुटू लागले की कढई गॅसवरून उतरवून हलवावे. जायफळ-वेलची पूड व खजूर घालून गार होण्यापूर्वी तुपाचा हात लावून त्याचे लाडू बनवावे.
-
टोमॅटो वडी साहित्य : टोमॅटो १ किलो, नारळाचा कीस ३ वाटय़ा, साखर अडीच वाटय़ा. कृती – टोमॅटो वाफवून त्याचा रस काढून घ्या. त्यात साखर व नारळाचा कीस मिसळून मिश्रण गॅसवर ठेवा. मिश्रण घट्ट झाल्यावर खाली उतरवून त्यात पिठी साखर घाला. एका ताटाला तूप लावून मिश्रण त्यात ओतून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या वडय़ा कापून खायला द्या.
दुर्वामृत गणपतीला मोदक आवडतो असे आपल्याला माहिती आहे, पण गणपतीसमोर आपण नेहमी दुर्वासुद्धा पाहतो असे आपल्या लक्षात येईल. पूर्वीच्या काळी लोकांनी असं लिहून ठेवलं होतं की गणपतीला मोदक आवडायचे आणि ते खाऊन-खाऊन त्याचे पोट खराब होऊ नये म्हणून दुर्वासुद्धा खायचे. साहित्य : दुर्वा २ वाटय़ा, पुदिन्याची पाने अर्धी वाटी, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ २ चिमूट, साखर चिमूटभर. कृती : २ वाटय़ा दुर्वा, अर्धी वाटी पुदिना, अर्धा लिंबाचा रस एकत्र करुन मिश्रण मिक्सरवर बारीक करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ व साखर घाला. साखरेचे प्रमाण मात्र मिठापेक्षा कमी ठेवा. नंतर हे मिश्रण गाळून फ्रीजमध्ये थंड करून प्यायला द्या. दुर्वामृत हे एक हटके पेय आहे. पारंपरिक पंचामृत तीर्थाला हा योग्य पर्याय आहे. हे पेय तुम्ही पाहुण्यांना मूसच्या रूपात देखील सव्र्ह करू शकता. (सौजन्य – व्हिवा )
गणपतीला दाखवा खास पण वेगळे नैवेद्य, ‘हे’ आहेत पर्याय
Web Title: Unique naivedya prasad for ganpat bappa ganesh chaturthi festival asy