-
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तर सचिन वाझे आपला जावई आहे का ? अशी विचारणा करत सभापती निलम गोऱ्हेंसमोर संताप व्यक्त केला.
-
"सचिन वाझे प्रकरणावरुन वातावरण अत्यंत संतप्त आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंनी पतीचा खून केल्याचा संशय व्यक्त केल आहे. प्रथमदर्शनी अनेक पुरावे समोर येत आहेत. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी पत्नीचा जबाब सांगितला तरी सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे," असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
-
"पूजा चव्हाण प्रकरणात २० दिवस एफआयआर दाखल झाला नाही. लॅपटॉपवरील पुरावे गायब झाले, अरुण राठोड गायब आहे, रुग्णलयात गर्भपात करणारी पूजा अरुण राठोड कोण हे अजून समोर आलेलं नाही," असा उल्लेख करत प्रवीण दरेकर यांनी कायदा-सुव्यस्थेवरुन सरकारवर निशाणा साधला.
-
"मनसुख हिरेन प्रकरणात ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या नष्ट करण्यासाठी सरकार संधी देत आहे," असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
-
"राज्यातील जनतेचा सरकावर विश्वास राहिलेला नाही. कोण लागून गेला सचिन वाझे? तुमचा जावई आहे का सभापती महोदय? का हे सरकार पाठीशी घालत आहे?," असे संतप्त सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारले.
-
पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला जात आहे असा आरोप करताना सचिन वाझेंना अटक करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.
-
सभापती निलम गोऱ्हे यांनी यावेळी प्रवीण दरेकर यांना सांगितलं की, "कायदा सुव्यवस्थेवर प्रस्ताव असून गृहमंत्री उत्तर देणार आहेत. तुम्ही बोलण्याच्या ओघात तो तुमचा जावई आहे का? असं म्हणालात. माझं असं मत आहे की जावई आरोपी असला तर त्यालाही सोडता कामा नये".
-
"जावईंच्या बाबतीत वेगळी वागणूक देणारं हे सरकार नाही असं आमचं निरीक्षण आहे," असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
-
दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली करणार असल्याची माहिती विधानपरिषदेत दिली.
-
"नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल. निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल," असं यावेळी त्यांनी सांगितलं.
सचिन वाझे जावई आहे का? विचारणाऱ्या प्रवीण दरेकरांना निलम गोऱ्हेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या….
विधानपरिषदेत जोरदार गदारोळ
Web Title: Maharashtra budget session bjp pravin darekar mansukh hiren sachin waze nilam gorhe sgy