-
२७ वर्षांनंतर दिल्लीला महिला मुख्यमंत्री!
दोन दशकांहून अधिक काळानंतर भाजपाने पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्रिपद मिळवले आहे. ही केवळ राजकीय घडामोड नाही, तर एका सामान्य कार्यकर्तीने झगडत सर्वोच्च स्थान गाठलेली प्रेरणादायी कहाणी आहे. (एक्सप्रेस फोटो) -
विद्यार्थिनी ते मुख्यमंत्री – संघर्षांचा प्रवास
रेखा गुप्ता यांनी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्या तीन वेळा नगरसेवक झाल्या, पहिल्यांदा आमदार आणि आता मुख्यमंत्री! त्यांच्या या प्रवासात त्यांनी स्वावलंबन आणि संघटनेचा आधार यांना महत्त्व दिले. (एक्सप्रेस फोटो) -
मुख्यमंत्री म्हणून पहिले मत – “स्वप्नातही विचार केला नव्हता”
मुख्यमंत्री झाल्यानंतर रेखा गुप्ता म्हणाल्या, “संपूर्ण दिल्लीची जबाबदारी माझ्यावर येईल, असं कधीच वाटलं नव्हतं.” त्यांच्या या प्रवासामागे चिकाटी, प्रामाणिकपणा व संघटनेची साथ होती, असं त्या स्पष्टपणे सांगतात. (एक्सप्रेस फोटो) -
महिला सक्षमीकरणासाठी भाजपाचा विश्वास
रेखा गुप्ता यांचं मत आहे की, भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे की, जो महिला आणि तरुणांना पार्श्वभूमी न पाहता संधी देतो. महिला आरक्षण विधेयकामुळे महिलांना आता खऱ्या अर्थाने राजकारणात स्थान मिळत आहे, असे त्या म्हणाल्या. (एक्सप्रेस फोटो) -
विकासाचे नवीन व्हिजन – रेखा गुप्ता यांची दिशा
मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी त्यांच्या योजनांमध्ये महिलांचा विकास, यमुनेची स्वच्छता, पाण्याचा प्रश्न, सांडपाणी व्यवस्थापन व शिक्षण यांवर भर दिला आहे. या सगळ्या मुद्द्यांवर त्या प्रामाणिकपणे काम करीत आहेत. (एक्सप्रेस फोटो) -
समविचारी सरकारांचा विकासासाठी एकत्रित प्रयत्न
रेखा गुप्ता म्हणाल्या की, आता केंद्र, राज्य व एमसीडी ही समविचारी सरकारं असल्यामुळे एकमेकांशी संघर्ष न करता सर्व जण विकासासाठी एकत्र काम करीत आहेत. पूर्वीच्या सरकारांना नेहमीच वाद घालायची सवय होती. (एक्सप्रेस फोटो) -
दिल्लीच्या विकासालाच सर्वोच्च प्राधान्य
“राज्याच्या इतर मागण्या बाजूला ठेवून, माझं पूर्ण लक्ष दिल्लीच्या विकासावर आहे,” असे स्पष्ट करत रेखा गुप्ता यांनी जनतेला विकासाचे आश्वासन दिले. (एक्सप्रेस फोटो) -
आम आदमी पक्षाला मिश्कील टोला
मुख्यमंत्री म्हणाल्या, “AAP आता त्यांच्या योग्य भूमिकेत म्हणजे विरोधी पक्षात आहे. ते दररोज मला ट्विट करून आठवण करून देतात की, काय करायचंय. ही एक प्रकारे त्यांची सेवा आहे, मी त्यांची आभारी आहे.” (एक्सप्रेस फोटो) -
विकास म्हणजे केवळ मोफत योजना नाहीत
“दिल्लीचं मागचं सरकार शहर दोन भागांत विभागायचं – एक कर भरणारा आणि दुसरा मोफत योजनेवर जगणारा. पण खरा विकास म्हणजे रस्ते, सांडपाणी व्यवस्था, रुग्णालयं व शाळा या मूलभूत सुविधा देणं,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. (एक्सप्रेस फोटो) -
यमुनेच्या स्वच्छतेसाठी ९,००० कोटींचा अजेंडा
“शपथ घेतल्यावर मी थेट यमुना नदीकडे गेले. २०० हून अधिक नाले हटवण्याचा, एसटीपी बसवण्याचा आणि पूरग्रस्त भाग ग्रीन झोनमध्ये बदलण्याचा ९,००० कोटींचा आराखडा तयार केला आहे,” असे सांगत, त्यांनी यमुनेच्या स्वच्छतेला आपला प्रमुख अजेंडा ठरवल्याचे सांगितले. (एक्सप्रेस फोटो) -
प्रत्येक घरात स्वच्छ नळपाणी देणं हेच लक्ष्य!
मुख्यमंत्री म्हणाल्या, “सध्या फक्त ४० टक्के भागात नळानं पाणी पोहोचतं. उर्वरित भाग टँकर किंवा बेकायदा बोअरिंगवर अवलंबून आहे. जोपर्यंत प्रत्येक घरी स्वच्छ नळपाणी पोहोचत नाही, तोपर्यंत मी शांत झोपणार नाही.” (एक्सप्रेस फोटो) -
झोपडपट्ट्यांमध्येही पायाभूत सुविधा मिळणार
रेखा गुप्तांनी सांगितले की, दिल्लीत १७३५ अनधिकृत वसाहती आहेत, जिथे अजूनही सांडपाणी व्यवस्थेचा अभाव आहे. सरकार आता अशा भागांमध्येही रस्ते, गटारं आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे. (एक्सप्रेस फोटो) -
प्रदूषणविरुद्ध मोठी पावलं!
“केजरीवाल सरकार ११ वर्षांत जे जमलं नाही, ते आम्ही चार महिन्यांत केलं,” असं सांगत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, ९५० इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावत आहेत, लवकरच त्या २,००० होतील. तसेच, धूळ कमी करण्यासाठी १००० वॉटर स्प्रिंकलर आणि स्मॉग गन रस्त्यांवर सुरू राहतील. (एक्सप्रेस फोटो) -
महिलांच्या सुरक्षेसाठी पक्का आराखडा
मुख्यमंत्री म्हणाल्या, “दिल्लीला सुरक्षित शहर बनवणं ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे.” अंधाराच्या जागांवर लक्ष ठेवून तिथे सीसीटीव्ही, पोलिस गस्त व पॅनिक बटण लावण्यात येणार आहेत. (एक्सप्रेस फोटो) -
महिलांसाठी ₹ २,५०० प्रतिमहिना योजना लवकरच
महिलांना दरमहा २,५०० रुपये देण्याची योजना पारदर्शक रीतीने राबवली जाणार आहे. त्यासाठी ५,१०० कोटींचे बजेट ठरवण्यात आले आहे आणि फक्त रेशनकार्डधारकांपुरते मर्यादित न ठेवता, इतर गरजू महिलांनाही या योजनेत समाविष्ट केले जाईल. (एक्सप्रेस फोटो) -
“विरोधात असताना ही साथ हवीच!”
मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, “AAP नेते सरकारमध्ये असतानाही विरोधी पक्षासारखं वागत होते, आता ते खऱ्या अर्थाने विरोधात आहेत.” त्या हसून म्हणाल्या, “ते मला रोज काय करायचं, ते आठवण करून देतात आणि ते मला आवडतं!” (एक्सप्रेस फोटो) -
योगी आदित्यनाथ आणि शीला दीक्षित यांचं कौतुक
मुख्यमंत्र्यांना जेव्हा विचारण्यात आलं की, त्यांच्यासाठी आदर्श मुख्यमंत्री कोण, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, “योगी आदित्यनाथ यांच्यात जबरदस्त ताकद आहे.” तसेच त्यांनी शीला दीक्षित यांचा उल्लेख “सौम्य आणि शिस्तबद्ध नेत्या” म्हणून केला. (एक्सप्रेस फोटो) -
दिल्ली – सगळ्यांचीच राजधानी!
“दिल्ली ही ‘मिनी इंडिया’ आहे. इथे प्रत्येकाला आपलेपणानं सामावून घेतलं जातं,” असं म्हणत रेखा गुप्तांनी सांगितलं की, दिल्ली सर्व राज्यांतील लोकांचं शहर आहे. त्यांनी स्पष्ट केले,, “जनतेनं जो विश्वास दाखवला आहे, तो मी कधीच तुटू देणार नाही.” (एक्सप्रेस फोटो)
पिण्याचे पाणी, महिला सुरक्षा ते प्रदूषण; एक्सप्रेस अड्डामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितला कृती आराखडा, वाचा
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ‘एक्स्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमात महिलांची सुरक्षा, पाणीटंचाई, सांडपाणी व्यवस्थापन व प्रदूषण या प्रमुख समस्यांवर स्पष्ट कृती आराखडा मांडला. या मुद्द्यांवर त्यांच्या सरकारची दिशा काय असेल, याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
Web Title: Delhi cm rekha gupta delhi action plan water women safety pollution svk 05